‘आयुषमान’च्या मार्गात राजकीय अडथळे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘आयुषमान भारत’ या जनहिताच्या योजनेच्या मार्गात विरोधी पक्ष त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी अडथळे आणत आहेत, असे शरसंधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पश्चिम बंगाल सरकारने आयुषमान भारत ही देशव्यापी योजना आपल्या राज्यात लागू करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या राज्यातील लक्षावधी लोक या योजनेपासून वंचित राहिले आहेत. ही योजना पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय होण्याची शक्यता असून तसे झाल्यास राज्यात भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढेल, या भीतीपोटी या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनजीं या योजनेपासून आपल्या राज्यातील जनतेला वंचित ठेवीत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या सरकारनेही ही योजना दिल्लीत लागू करण्यास नकार दिला असून त्यामुळे दिल्लीतल्या लोकांनाही या योजनेचा लाभ मिळत नाही. विरोधी पक्ष जनतेच्या हिताचा विचार करण्याऐवजी स्वत:चे हित आणि राजकीय संकुचित स्वार्थ यांना प्राधान्य देतो. ही प्रवृत्ती देशहितास घातक आहे. पश्चिम बंगाल आणि दिल्ली या दोन राज्यांमध्ये आयुषमान भारत योजना लागू न झाल्याने तेथील जनता नाराज असून संधी मिळताच विरोधी पक्षांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
संकुचित राजकारण
आपल्या प्रतिस्पर्ध्याला राजकीय लाभ मिळू नये. म्हणून आपल्याच राज्यातील जनतेला योजनांचा लाभ मिळू द्यायचा नाही, ही भूमिका मुळातच नकारात्मक आहे. मात्र, अलिकडच्या काळात सर्वसामान्य मतदारांकडून असे डावपेच उधळले जातात. कोणत्याही विकासविरोधी पक्षाला जनता थारा देत नाही. असे राजकारण केल्याने जनतेने अनेकवेळा विरोधी पक्षांना धडा शिकविला असूनही ते योग्य मार्गावर येत नाहीत, अशा आशयाची टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
जनतेकडे क्षमा याचना
पश्चिम बंगाल राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारमुळे आपण या राज्यातल्या जनतेला आयुषमान योजनेचा लाभ देऊ शकलो नाही, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल आणि दिल्लीच्या जनतेकडे क्षमायाचनाही केली. ही योजना या राज्यांमध्ये लागू झाली असती तर आनंद झाला असता. अशा योजना तरी निदान संकुचित राजकारणापासून दूर ठेवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.