येत्या काळात कोल्हापुरात राजकीय भूकंप ! अनेकजण शिवसेनेच्या वाटेवर; जिल्ह्यातील ६ जागा जिंकणार- राजेश क्षीरसागर
येत्या विधानसभा निवडणुकांच्या आधी कोल्हापूरामध्ये राजकिय भुकंप घडणार असून महाविकास आघाडीचे दोन मोठे नेते महायुतीच्या वाटेवर असल्याचा धक्कादायक खुलासा शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे.
आज राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर टिका केली. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी काल काँग्रेस कमिटीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टिकेचा समाचार घेताना सतेज पाटलांनी कोल्हापूरसाठी काय केलं हे सांगावं असं आव्हानही त्यांनी केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे बोलतात ते करून दाखवतात. लाडक्या बहिणींचे सबलीकरण करण्यासाठी यशस्वीरीत्या राबविण्यात आलेली "लाडकी बहीण" योजना असो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी कार्यरत असून त्यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टिका राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. आमदार सतेज पाटील यांच्यावर टिका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल बेताल वक्तव्ये त्यांची लोकप्रियता व लाडकी बहीण योजनेचे यश सावत्रभावांच्या डोळ्यात खुपत असल्याचे सांगून सतेज पाटील यांनी कोल्हापूरसाठी काय केले हे सांगावं असा टोलाही त्यांनी लगावला.
मोठे नेते महायुतीच्या वाटेवर
यावेळी बोलताना त्यांनी, कोल्हापुरात राजघराण्याविषयी कोल्हापूर वासियांचे असलेले प्रेम हेच शिवसेनेच्या उमेदवाराच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले आहे. परंतु, पराभवाने खचून न जाता शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यात एकसंघपणे काम करत आहे. शिवसेनेचे खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, तिन्ही जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख सर्वजण एकजुटीने काम करत आहोत. त्यामुळे शिवसेनेमध्ये सामील होण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. येत्या काही दिवसांत कोल्हापुरात राजकीय भूकंप होणार असून, जिल्ह्यातील मोठे नेते शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून आणणार, असा विश्वासही राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.