For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तामिळनाडूत ‘लाचखोरी’वरून राजकीय रणकंदन

07:00 AM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
तामिळनाडूत ‘लाचखोरी’वरून राजकीय रणकंदन
Advertisement

टीव्हीकेचे मंत्री विल्सन यांच्याकडून स्वयंगोल : विरोधी पक्ष आक्रमक

Advertisement

वृत्तसंस्था/चेन्नई

तामिळनाडूत विजय सरकारच्या एका मंत्र्याने स्वयंगोल केला आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय लाचखोरीच्या प्रकरणामुळे अडचणीत आले. तामिळनाडूचे अर्थमंत्री एन. मेरी विल्सन यांनी विधानसभेत अलिकडेच ‘लाचे’वरून एक वक्तव्य केले, यानंतर राज्यात राजकीय वादळ उभे ठाकले आहे. प्रमुख विरोधी पक्ष द्रमुक, अण्णाद्रमुक आणि भाजपने मंत्र्याच्या वक्तव्याप्रकरणी तत्काळ चौकशी करण्याची आणि चौकशी पूर्ण होइपर्यंत मंत्र्याची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. राज्यात मागील द्रमुक सरकारच्या कार्यकाळादरम्यान चेन्नईत स्वत:च्या शैक्षणिक संस्थांना मंजुरी मिळवून देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला भरभक्कम रक्कम म्हणजेच लाच द्यावी लागली होती असा दावा अर्थमंत्री विल्सन यांनी विधानसभेत केला. मी स्वत: याचा पुरावा आहे, मी चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे विल्सन यांनी म्हटले होते.

Advertisement

विरोधी पक्षांकडून लक्ष्य

विधानसभेत एक मंत्रीच आपण लाच दिल्याचे मान्य करत आहे, हा अत्यंत मोठा गुन्हा आहे. मंत्रीच लाच दिल्याचा दावा करत असल्याने याप्रकरणी दक्षता विभागाने त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी द्रमुक नेते अनबिल महेश पोयामोझी यांनी केली आहे. कायद्यानुसार लाच देणे अन् घेणे गुन्हाच आहे. सरकारने याप्रकरणी लाच देणारा तसेच लाच स्वीकारणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी असे भाजप प्रदेशाध्यक्ष नागेंद्रन यांनी म्हटले.

टीव्हीकेचे स्पष्टीकरण

सरकारच्या वतीने आरोग्यमंत्री के.जी. अरुणराज यांनी विल्सन यांचा बचाव केला. विल्सन यांना गुन्हेगार मानण्याऐवजी ‘व्हिसलब्लोअर’ मानले जावे. विल्सन यांनी केवळ मागील सरकारमधील गैरप्रकार समोर ठेवले आहेत असा दावा अरुणराज यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.