मांजाविरुद्ध पोलिसांची व्यापक कारवाई सुरूच
अकरा रोल जीवघेणा मांजा जप्त
बेळगाव : बेळगाव पोलिसांनी जीवघेण्या मांजाविरुद्ध कारवाई सुरूच ठेवली आहे. टिळकवाडी व शहापूर पोलिसांनी बुधवारी दिवाळी पाडव्यादिवशी अनगोळ व शहापूर येथील दोन दुकानांवर छापे टाकून मांजाचे अकरा रोल जप्त केले आहेत. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनगोळ येथील शुभम सोनवालकर यांच्या दुकानातून तीन मांजाचे रोल जप्त केले आहेत. शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांनी नवी गल्ली, शहापूर येथील एका लहान मुलाकडून मांजाचे आठ रोल जप्त केले आहेत. हा मुलगा मांजा वापरत होता. शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मांजाविरुद्ध कारवाईची सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या दुकानात तपासणी केली जात आहे. मांजामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या पंधरवड्यात मांजाच्या दोऱ्यामुळे अनेकांच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे मांजा वापरणे व विक्रीविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात येत आहे.