म. ए. समितीच्या 104 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
एपीएमसीमधील रयत केंद्रात ठेवले नजरकैदेत
बेळगाव : महामेळाव्यात सहभागी होण्यासाठी व्हॅक्सिन डेपो मैदानाकडे येणाऱ्या म. ए. समिती नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना वाहनांमध्ये कोंबून एपीएमसी मार्केट यार्डमधील रयत भवनमध्ये नजरकैदेत ठेवले. ताब्यात घेतलेल्या 104 जणांची सायंकाळी सुटका करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी ही धरपकड केली. मात्र याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले.
सुवर्णविधानसौधमध्ये 8 डिसेंबरपासून होत असलेल्या कर्नाटक सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाला विरोध म्हणून महामेळावा भरविण्याचा निर्णय मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने घेण्यात आला होता. त्यासाठी विविध ठिकाणी मेळावा घेण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. ऐनवेळी पोलिसांनी व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा घ्या, अशी तोंडी परवानगी म. ए. समिती नेत्यांना दिली. त्यानुसार सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी 11 वाजता व्हॅक्सिन डेपो मैदानावर जमावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले. मात्र नेहमीप्रमाणे पोलिसांनी दुटप्पी भूमिका घेत रविवारी रात्रीच
व्हॅक्सिन डेपो मैदानाचा ताबा घेतला. मैदानाकडे येणारे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले. सकाळपासून गटागटाने येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली.इतकेच नव्हे तर म. ए. समिती नेत्यांनाही बळजबरीने ताब्यात घेण्यात आले. सुमारे 104 जणांना बसेस त्याचबरोबर पोलीस वाहनांमधून नेऊन एपीएमसी मार्केट यार्डमधील रयत केंद्रात नजरकैदेत ठेवण्यात आले. मात्र त्या ठिकाणीही पोलिसांचा दबाव झुगारून प्रतिमेळावा यशस्वी करण्यात आला. केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही धरपकड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सायंकाळनंतर सर्वांना सोडून देण्यात आले. एपीएमसी मार्केट यार्डमधील रयत केंद्र परिसरात पोलीस निरीक्षक उस्मान अवटी व त्यांचे सहकारी बंदोबस्तावर होते.
गतवर्षी धर्मवीर संभाजी चौकात महामेळावा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. यंदादेखील संभाजी चौकात महामेळावा घेण्यास परवानगी मागितली होती. मात्र ऐनवेळी व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा घेण्याचे निश्चित झाले. पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम रहावी या दृष्टिकोनातून सोमवारी सकाळपासूनच धर्मवीर संभाजी चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. व्हॅक्सिन डेपो मैदानावर समितीकडून महामेळाव्याचे आयोजन करण्यात येत असल्याचे समजताच कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्हॅक्सिन डेपोकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती समजताच पोलिसांनी कन्नडिगांना संचयनी चौकात रोखून ताब्यात घेतले.