For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी

01:09 PM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी
Advertisement

मद्यपी वाहनचालकांची तपासणी : अँटीस्टॅबिंग स्कॉड सक्रिय : सीसीटीव्ही-बॉडी कॅमेऱ्यांद्वारे नजर

Advertisement

बेळगाव : होळी आणि रंगोत्सव शांततेत पार पाडावा, या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून मंगळवारी शहर आणि तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचा आदेश बजावण्यात आला असला तरीही याकाळात मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळेच रहदारी पोलिसांकडून ठिकठिकाणी मद्यपी वाहनचालकांची अडवणूक करून तपासणी केली. दरवर्षी बेळगावात होळी आणि रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

मात्र रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी पोलीस खात्याकडून यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यासह सीसीटीव्ही व बॉडी कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्याची सूचना पोलिसांना केली होती. तसेच विविध 19 ठिकाणी चेकपोस्ट सुरू करण्यात आले होते. त्या ठिकाणी मद्यपी वाहनचालकांना थांबवून त्यांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली जात होती. वाहतूक पोलीस ठिकठिकाणी थांबून वाहनचालकांची अडवणूक करीत होते.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि तालुक्यात अनेक अप्रिय घटना घडत आहेत.विशेषकरून गांजा व इतर अमलीपदार्थांची रेलचेल वाढली असल्याने त्यावर नियंत्रण मिळविताना पोलिसांच्या नाकीनऊ येत आहेत. तसेच मद्यप्राशन करून वाहने चालविली जात असल्याने अपघात घडत आहेत. रंगोत्सव काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, सण उत्साहात पार पाडावा यासाठी पोलीस खात्याकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.

पोलिसांकडून मेटल डिटेक्टरद्वारे तरुणांची तपासणी

गेल्या काही महिन्यांपासून शहर आणि तालुक्यात तलवार, चाकू, जांबियाने भोसकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अँटीस्टॅबिंग स्कॉडची नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून संशयास्पदरित्या फिरणाऱ्यांची झाडाझडती घेतली जात आहे. एखाद्या वेळेस शस्त्र आढळून आल्यास ते जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रंगोत्सवकाळात चाकू हल्ल्यासारखी घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून मेटल डिटेक्टरद्वारे तरुणांची तपासणी केली जात होती.

Advertisement
Tags :

.