Kolhapur : कोल्हापुरात सिंघम स्टाईलने पोलिसांनी गुंडाचा उतरवला माज !
पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या गुंडांना पोलिसी खाक्या
कोल्हापूर : मध्यरात्री भर रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यापासून रोखणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास तिघा सराईत गुंडांनी मारहाण केली होती. या प्रकरणी सादीक मोहंम्मद पाटणकर (वय २०), अवधुत पिराजी गजगेश्वर (वय १९), आदित्य राहुल भोजणे (वय २२ सर्व रा. लक्षतीर्थ बसाहत) या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिघांना चांगलीच समज दिली असून, साहेब यापुढे आम्ही वाढदिवसच साजरा करणार नसल्याची त्यांनी कबुली पोलिसांसमोर दिली आहे..
.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ इश्राम सामंत हे सोमवारी रात्री नाईट ड्युटीला होते. रात्री १२ बाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन पेट्रोलिंग करत लक्षतीर्थ वसाहत येथे गेले होते. यावेळी तीन तरुण रस्त्यावर उभे राहून आरडाओरड करत असल्याचे दिसून आले. पंढरीनाथ सामंत यांनी जवळ जावून पाहिले असता, ते तिघे रस्त्याच्या मधोमध दुचाकीवर केक ठेऊन वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसून आले.
सामंत यांनी सादीक पाटणकर, अवधुत गजगेश्वर, आदित्य भोजणे दंगा करु नका, येथून निघून जाण्यास सांगितले होते. मात्र, या तिघांनी सामंत यांनाचा मारहाण करुन पळ काढला होता. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यांना शनिवार (१८ ऑक्टोंबर) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या तीनही संशयितांना चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला आहे. यामुळे या तिघांनी साहेब आम्ही आता आमचा वाढदिवसच साजरा करणार नाही...
आणी कोणाच्याच वाढदिवसाला जाणार नसल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. या तिघांना पोलिसांनी चांगलाच खाक्या दाखविल्यामुळे त्यांची मस्ती जिरली आहे.
तिघांना घटनास्थळी फिरवले
सादीक मोहंम्मद पाटणकर, अवधुत पिराजी गजगेश्वर, आदित्य राहुल भोजणे या तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी लक्षतीर्थ परिसरातून फिरवले. ज्या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली, त्या ठिकाणाहून ते पळून गेलेल्या सर्व ठिकाणापर्यंत तिघाही संशयितांना फिरविण्यात आले. ज्या ठिकाणी आपली दहशत आहे, त्याच ठिकाणी पोलिसांनी घटनेची माहिती घेण्यासाठी फिरवल्यामुळे तिघाही संशयितांचा रुबाब चांगलाच उतरला. यावेळी लक्षतीर्थ वसाहत परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी होती, यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.