Kolhapur News : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडीवर पोलिसांची सर्जिकल स्ट्राईक
महालक्ष्मी चेंबर्ससमोरील बेशिस्त पार्किंगवर पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरात नागरीकांसह प्रवाशांची दररोज वर्दळ असते. याचसोबत महालक्ष्मी चेंबरमध्ये खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची कार्यालये आहेत. तसेच परिख पुलाखालून वाहतूक बंद असल्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.
मध्यवर्ती बसस्थानक परिसर, महालक्ष्मी चेंबर्स परिसराता दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्याकडेला लावली जातात. यातच कार्यालयांचे फलक लावून जागा अडवून ठेवली जाते. त्यानंतर चारचाकी वाहने थांबतात. काही ठिकाणी याच गर्दीत ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जातात. यामुळे वाहतूक कोंडी होते.
मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटींसाठी हा प्रमुख मार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते.शुक्रवारी (दि. ५) रात्री अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी महालक्ष्मी चेंबरसमोरील पार्किंगची पाहणी केली. तेथील ट्रॅव्हल्स चालक आणि मालकांची भेट घेऊन सूचना केल्या.
तसेच या परिसरात ट्रॅव्हल्स थांबवू नयेत अशा सक्त सूचना दिल्या. त्यानुसार शनिवारी सकाळपासून पोलिसांनी अंमलबजावणी केली. बेशिस्त पार्किंग करणाऱ्या १३ वाहनधारकांकडून साडेसहा हजारांचा दंड वसूल केला. शुक्रवारी रात्री पार्किंगची पाहणी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक बच्चू यांच्यासह शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके उपस्थित होते.