पोलीस क्रीडा खेळाडू दिव्यांग साक्षी बनसोडे हिची पॅरा ऑलिपिंकसाठी निवड
सातारा :
आपल्याला आलेल्या दिव्यांग पणातूनही वेगळी वाट चोखळत त्या वाटेवरचे आपणच राजा बनण्याचे काम करणारे काही अवलिया सातारा जिह्यात होवून गेलेले आहेत. आणि नव्याने कर्णबधीर असलेली खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली गावची साक्षी बनसोडे ही ज्युदोमध्ये करिअर करण्यासाठी साताऱ्याच्या पोलीस क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत असून तीने नुकतीच मलेशिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय डेफ एशियन ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक व सांघिकमध्ये कास्य पदक पटकावले असून आगामी होणाऱ्या पॅरा ऑलंपिक स्पर्धेकरता भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
दिव्यांग खेळाडू म्हणून यापूर्वी सातारा जिह्यात महाबळेश्वरचे भावेश भाटीया यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर दिव्यांग खेळाडू म्हणून करंजेतील एका मुलीने शुटींगमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली होती. साताऱ्यातील दिव्यांग खेळाडूही कुठे कमी नाहीत आपली चमकदार कामगिरी करुन साताऱ्याचे नाव उज्वल करतात. त्यामध्येच नव्यानेच सातारा पोलीस क्रीडा प्रबोधिनीची खेळाडू साक्षी हिने नवा विक्रम केला आहे. मलेशिया येथे दि. 1 डिसेंबर ते दि. 8 डिसेंबर या दरम्यान आंतरराष्ट्रीय डेफ एशियन ज्युदो चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत तिने पहिले सुवर्ण भारताला मिळवून दिले. त्यानंतर सांघिकमध्ये कास्य पदक पटकावत साताऱ्याचे नाव उज्वल केले. तिची निवड आगामी होणाऱ्या पॅरा ऑलंपिक स्पर्धेकरता भारतीय संघात निवड करण्यात आली.
साक्षी बनसोडे हिला प्रशिक्षण स्पोर्ट इन्चार्ज सुनील सपकाळ, सहाय्यक स्पोर्ट इन्चार्ज सॅम्युअल भोरे, प्रशिक्षक पो. कॉ. दत्तात्रय भोसले, म. पो. कॉ. स्वाती जाधव यांनी शास्त्रशुद्ध दिले. तिने मिळवलेल्या यशाबद्दल सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपअधीक्षक गृह अतुल सबनिस, राखीव पोलीस निरीक्षक राजू शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पोलीस कल्याण व मानवी संसाधनचे सुनील चिखले यांनी अभिनंदन केले.
शेतकऱ्याची कन्या ज्युदोत नाव कमवतेय
कोणताही खेळ असो, त्या खेळातील खेळाडूला घडवण्यासाठी खूप पैसा आणि खूप परिश्रम घ्यावे लागतात. सर्वसामान्याचे कामच नाही. एकतर सरकारी नोकरदार किंवा उद्योजक असेल तर त्याच्या पाठीमागे आर्थिक पाठबळ उभे राहत असते. परंतु साक्षी बनसोडे हिच्यासाठी तिचे आईवडील हे सर्वसामान्य शेतकरी आहेत. आई तिच्यासाठी एक मैत्रिण म्हणूनच एक गुरु म्हणून तिच्यासोबत साताऱ्यात रहाते आणि तिला मार्गदर्शन करते तर तिचे वडील हरीदास बनसोडे हे गावाकडे शेती करतात. त्यामुळे त्यांच्या आणि जिद्दीला सातारा पोलीस दलासह खटाव आणि माण तालुक्यातील अनेकांनी सलाम केला आहे.