पोलीस भरतीत बोगसगिरी करणारा गजाआड
सातारा :
सातारा पोलीस दलाची भरती प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यामध्ये एका उमेदवाराकडे बोगस प्रकल्पग्रस्त असा दाखला निदर्शनास आला. त्या अनुषंगाने सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढा, अशा सूचना दिल्या होत्या. सातारा पोलिसांनी या प्रकरणी एकास बीड येथून अटक केली असून त्याचे नाव गणेश देविदास पानसरे (रा. बीड) असे आहे. त्याने प्रकल्पग्रस्ताचे दाखले बीड जिल्हाधिकारी कार्यालयातला मृत अंशकालीन कर्मचारी जालिंदर गोरे याने पुरवले असल्याचा खळबळजनक तपास सातारा पोलिसांनी केला आहे.
सातारा पोलीस डिटेक्शनमध्ये नंबर वन आहेच त्याबद्दल गौरव झाला आहे. पण सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या चाणाक्ष नजरेतून अट्टल गुन्हेगाराबरोबरच व्हाईट कॉलर गुन्हेगारसुद्धा सुटत नाहीत. सातारा पोलीस भरती 2021 ची नोव्हेंबर 2022 पासुन राबवण्यात आली होती. त्यात एका उमेदवाराने समांतर आरक्षण मिळवुन भरतीसाठी बनावट प्रकल्पग्रस्त दाखला सादर केला होता. पोलीस भरतीचा लाभ घेण्याकरता पोलीस प्रशासनाची फसवणुक केली होती. गुन्हा गंभीर स्वरुपाचा व पोलीस भरती संदर्भाने असल्याने गुन्ह्याचा सखोल तपासासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. बनावट प्रकल्पग्रस्त दाखले उमेदवारांना पुरविणाऱ्या आरोपींची पाळेमुळे शोधुन काढण्याच्या सूचना एलसीबीचे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिलेल्या होत्या. त्यानुसार देवकर यांनी सपोनि सुधीर पाटील यांच्याकडे तपास देवुन त्यांचे अधिनस्थ पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते. त्या पथकाने पोलीस भरतीमध्ये प्रत्यक्षात बनावट प्रकल्पग्रस्त दाखल्याचा वापर करुन प्रशासनाची फसवणुक करुन फरार असणाऱ्या उमेदवार आरोपीस यापुर्वी अहमदनगर जिल्ह्यात जावुन शिताफीने अटक केली होती. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यास बनावट प्रकल्पग्रस्त दाखला पुरविणारा अन्य एक जण बीड जिल्ह्यातील असल्याचे समोर आले.
गोरे याने सातारा जिल्ह्याप्रमाणे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात झालेल्या पोलीस भरतीमध्ये देखील उमेदवारांना बनावट प्रकल्पग्रस्तांचे दाखले पुरविलेले होते. त्यामुळे त्याच्याविरुध्द गुन्हे दाखल होवुन महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील पोलीस पथकेदेखील त्याचा शोध घेत होते. तो फरार झालेला होता. त्याच्यावर महाराष्ट्रात सातारा, अलिबाग, पुणे, गडचिरोली, यवतमाळ, याठिकाणी 10 गुन्हे दाखल आहेत. सातारच्या पथकाने बीड- अहमदनगर जिल्ह्यात जावुन वेषांतरे करुन खास खबरे नेमुन माहिती गोळा केली. त्या माहितींचे योग्य प्रकारे विश्लेषण करुन सातारा व महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात सन 2022-2023 साली झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेकरीता उमेदवारांना बनावट प्रकल्पग्रस्त दाखले पुरविणाऱ्या आरोपीस शोधुन काढुन त्यास दि. 16 रोजी अटक केली आहे.
गणेश पानसरे याला सातारा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. कोठडीत त्याने बनावट प्रकल्पग्रस्त दाखले त्याचे चुलते बळीराम दादाराव पानसरे याचे मध्यस्थीने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय, पुनर्वसन अभिलेख विभागात कार्यरत असणारा अंशकालीन कर्मचारी जालिंदर लक्ष्मणराव गोरे याने पुरविले होते असे त्याने सांगितले. तो कर्मचारी 2021 मध्ये कोरोना रोगाच्या साथीमध्ये मयत झाला असुन त्याने तत्कालीन कालावधीत त्यास ज्ञात असलेल्या प्रकल्पांच्या माहितीचा गैरवापर करुन बनावट प्रकल्पग्रस्त दाखले पुरविलेले होते. असे तपासामध्ये निष्पन्न झाले असुन याचा गुन्ह्याचा पुढील तपास चालु आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. सुधीर पाटील, रोहित फाणे, पोउनि विश्वास शिंगाडे, परितोष दातीर पो. अंमलदार पो. हवा. सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, अमोल माने, अमित झेंडे, अजय जाधव, प्रविण फडतरे, ओंकार यादव, वैभव सावंत, हसन तडवी, मुनिर मुल्ला, राजू कांबळे, गणेश कापरे, मनोज जाधव, धिरज महाडीक, अमृत कर्पे, विजय निकम यांनी केली आहे. तपासामध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कारवाई व कौशल्यपुर्ण तपासाबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उप-अधीक्षक, (गृह) अतुल सबनीस यांनी अभिनंदन केले.