For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलिसांची हिंडलगा कारागृहाला धडक

06:39 AM May 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोलिसांची हिंडलगा कारागृहाला धडक
Advertisement

मोबाईल नेमके येतात कोठून? याचा शोध घेण्याचा प्रयत्न

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल सापडण्याचे प्रकार सुरूच आहेत. या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी शनिवारी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी कारागृहाला भेट दिली असून कारागृहात मोबाईल येतात कसे? याची माहिती मिळविण्याचे प्रयत्न केले आहेत.

Advertisement

बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी कारागृहाला भेट देऊन चौकशी केली. 24 एप्रिल रोजी दुपारी 1.20 ते 1.45 या वेळेत सर्कल नं. 2 मधील दुसऱ्या क्रमांकाच्या बराकीत तपासणी करताना शौचालयातील कमोडजवळ कापडात गुंडाळून ठेवलेला की-पॅडचा मोबाईल सापडला होता.

त्याआधीही अनेक प्रकरणे घडली आहेत. वेगवेगळ्या बराकीत कैद्यांकडे मोबाईल सापडत आहेत. 24 एप्रिलच्या घटनेसंबंधी जेलर यल्लाप्पा नायक यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणानंतर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी कारागृहात वारंवार सापडणाऱ्या मोबाईलचे मूळ शोधण्याची सूचना आपल्या अधिकाऱ्यांना केली आहे.

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात हिंडलगा मध्यवर्ती कारागृह येते. सातत्याने घडणारे गैरप्रकार, यासंबंधी दाखल होणारे एफआयआर, त्यांचा तपास आदी कारणांमुळे कारागृह अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस अधिकारीही वैतागले आहेत. एखाद्या बराकीत मोबाईल सापडतो त्यामध्ये सीमकार्ड नसते. त्याचे मूळ शोधण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकते.

प्रत्यक्षात कारागृहात कडक तपासणी असूनही मोबाईल येतात कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सध्या पोलीस अधिकाऱ्यांनी कंबर कसली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकी देणाऱ्या जयेश पुजारीवरही मोबाईल बाळगल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाले आहेत. त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.