जुने बेळगाव स्मशानभूमीनजीकच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
5 जुगाऱ्यांना अटक : 8150 रुपयांची रोकड जप्त
बेळगाव : जुने बेळगाव स्मशानभूमीनजीकच्या जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकून 5 जुगाऱ्यांना अटक केली आहे. सोमवार दि. 17 रोजी ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 8 हजार 150 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. हमीद इनुशा कागजी (वय 44) रा. होसूर तांबिटकर गल्ली, शहापूर, मोसिन अब्दुलखादर सदरसोधा (वय 24) रा. पाटील गल्ली, खासबाग, उमेश कल्लाप्पा खन्नूकर (वय 34) रा. विष्णू गल्ली, वडगाव, राहुल बाबू होसूरकर (वय 30) रा. लक्ष्मी गल्ली, जुने बेळगाव, उत्तम मनोहर भराटे (वय 35) रा. महावीरनगर, कपिलेश्वर कॉलनी अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. जुने बेळगाव स्मशानभूमीनजीकच्या खुल्या जागेत बसून काहीजण जुगार खेळत आहेत, अशी खात्रीलायक माहिती शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक एस. एन. बसव्वा व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात कलम 87 केपी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.