Kolhapur News : तिटवेत शेतातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण अटकेत
राधानगरी तालुक्यात जुगार अड्डा उद्ध्वस्त;
कोल्हापूर -तिटवे (ता. राधानगरी) येथे शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. यामध्ये आठ जणांना अटक करण्यात आली आहे. १० जणांनी पोलिसांना चकवा देऊन पळ काढला. अटक केलेल्यांकडून रोख ६७ हजार रुपये, पाच मोबाईल, दुचाकी असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चंद्रकांत यशवंत पाटील (वय ६२, रा. आदमापूर), शंकर तिमाण्णा पोबार (बय ४०, तुरंबे), नवनाथ तानाजी बाईंगडे (सरवडे), शुभम कृष्णा चव्हाण (वय २९, चंद्रे), तुळशीदास यशवंत कांबळे (वय ३७,बेले), विनोद बबन पाटील (आदमापूर), अशोक बसाप्पा पोवार (तुरंबे), प्रवीण गोजारे (मडिलगे), यांना पोलिसांनी अटक केली आहे. पसार झालेल्या दहा जणांचा शोध राधानगरी पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिटवेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीसअंमलदार संजय देसाई, राजू कोरे यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती निरीक्षक सुशांत चव्हाण यांना देऊन पथकासह छापा टाकला. पोलीस आल्याची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांनी आसपासच्या शेतात पळ काढला. यातील आठ जणांना पकडण्यात यश आले.