Miraj News | उद्घाटन मोठ्या थाटात, पण पोलिस चौकी कायम कुलूपबंद; मिरजकरांचा संताप
मिरज : वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी शहरातील स्टेशन चौकाजवळ सुरू केलेली आणि महानिरीक्षकांच्या हस्ते बाटामाटात उद्घाटन झालेली महात्मा गांधी चौक पोलिस चौकी 'सदाबंद' आहे. एकही पोलिस कर्मचारी अथवा अधिकारी येथे फिरकत नाहीत. बंद असलेल्या इमारतीला नशेखोरांनी विळखा घातला आहे.
दरवाजा तोहून, खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. दरवाजातच झाडे वाढली असून, पोलिस चौकाची अक्षरशः कचरा कुंडी झाली आहे. याकडे पोलिस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे.मिरज रेल्वे जंक्शन आणि मिरज बस स्थानक परिसरातील गुन्हेगारींना आळा घालण्यासाठी तीन वर्षापूर्वी मिरज रेल्वे जंक्शनजवळ महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत मिरज रेल्वे जंक्शन रोड पोलीस चौकी तयार करण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात या परिसरातील गुन्हेगारांवर अंकुश होता.
मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने मिरज रेल्वे जंक्शन पोलीस चौकी कुलुपबंद झाली आहे.पोलीस कर्मचाऱ्यांविना पोलीस चौकी ओसाड पडली आहे. आओ जाओ घर तुम्हारा अशी अवस्था या पोलीस चौकीची झाली आहे. त्यामुळे मिरज रेल्वे जंक्शन आणि मिरज बस स्थानक परिसरात गुन्हेगारांचा पुन्हा वावर वाढल्याने प्रवाशांचा जीव घोक्यात आला आहे. सर्वांना आधार देणारी मिरज रेल्वे जंक्शन पोलीस चौकीच बेवारस झाल्याचे चिंताजनकचित्र निर्माण झाला आहे. याबाबत नूतन पोलीस अधीक्षक तुषार जोशी याकडे लक्ष देणार का? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.