रात्रीच्यावेळी पोलिसांकडून शहरात मोटारसायकलवरून गस्त
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
पुणे, मुंबईच्या धर्तीवर बेळगावात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या काळात श्रीमूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने गणेशभक्त रात्री उशिरापर्यंत गर्दी करतात. यावेळी महिलांची छेडछाड यासह इतर प्रकारच्या अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून दररोज शहरात मोटरसायकलवरून गस्त घातली जात आहे.
आकर्षक गणेशमूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून शहर आणि परिसरात गणेश भक्तांची मोठी गर्दी होत आहे. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी पोलीस खात्याकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पडावी, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी अडीच हजारहून अधिक पोलीस तैनात असणार आहेत.
विसर्जनाला केवळ एक दिवस शिल्लक असल्याने देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची शहर परिसरात अलोट गर्दी होत आहे. त्यामुळे गर्दीचा फायदा समाजकंटक किंवा गुन्हेगारांकडून उचलण्यात येऊ नये, यासाठी पोलीस अधिकारी रात्रीच्यावेळी शहर परिसरात गस्त घालत आहेत. सर्व साहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक रात्रीच्या गस्तीवर बाहेर पडत आहेत.