Crime News : वादक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पोलीस पाटलांची आत्महत्या, कारण गुलदस्त्यात
दुपारी त्यांची पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला
रत्नागिरी : शहराजवळील कर्ला-लिमयेवाडी येथील पोलीस पाटील यांनी अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. उदय मधुसुदन लिमये (56, रा. लिमयेवाडी कर्ला, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आह़े
उदय लिमये हे कर्ला येथे पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते. तसेच ते वादक म्हणूनही प्रसिद्ध होते. बुधवार 28 मे रोजी सकाळी त्यांची पत्नी अंगणवाडीत कामाला गेली होती. घरी कोणीही नसताना उदय लिमये यांनी कोणत्या तरी
अज्ञात कारणातून घराच्या छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.
दुपारी त्यांची पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यावेळी नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उदय लिमये यांना तपासून मृत घोषित केले. पोलीस पाटील उदय लिमये यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.
