For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुकीत पोलीस 24 तास ऑन ड्युटी

01:33 PM Nov 13, 2024 IST | Radhika Patil
निवडणुकीत  पोलीस 24 तास ऑन ड्युटी
Police on duty 24 hours during elections
Advertisement

नेते, मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सुट्ट्या रद्द : यंदाची दिवाळीही रस्त्यावरच : वाहतुक सुरळीत करताना दमछाक : सायबर पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर

Advertisement

कोल्हापूर/ इम्रान गवंडी : 

विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ 10 दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने जिल्ह्यातील दहाही मतदार संघात प्रचाराच धुरळा उडाला आहे. गाठीभेटींना वेग आला आहे. जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट असल्याने प्रचारासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, केंद्रीय मंत्री, इतर राज्यातील मंत्रीही दाखल होत आहेत. त्यांच्या बंदोबस्तासाठी शहरासह जिल्ह्यातील गावागावात, चौकाचौकात पोलीसांचा 24 तास खडा पहारा आहे.

Advertisement

प्रचाराचा धुरळा उडला असतानाच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, निवडणूक सुरळीत पार पाडावी, कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी जिल्ह्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी, विशेष पथके अहोरात्र पहारा देत आहेत. प्रमुख नेते, मंत्र्यांचे दौरे, जाहीर प्रचार सभा, गाठीभेटीमुळे पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. ऐन दिवाळीतच निवडणुका लागल्याने पोलिसांची दिवाळी रस्त्यावरच साजरी झाली आहे. आता निवडणुका होऊन निकाल लागेपर्यंत सुट्टी नाहीच असे फर्मान असल्याने पोलिसांचा मानसिक तणाव वाढला आहे. त्यातच अनपेक्षित वेळी कोणत्याही ठिकाणी ड्युटी लागत असल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यातच रोज घडणारे गुन्हे, त्याच्या तपासाठी द्यावा लागणारा वेळ व निवडणूक बंदोबस्त याचे नियोजन करताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

आचारसंहिता लागताच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याने बाहेरून पोलीस बंदोबस्त मागवावा लागत आहे. मतदान व मतमोजणीदिवशी विविध राज्यातून 800 पोलिसांचा फौजफाटा व 3 हजारांवर गृहरक्षक दलाचे जवान कोल्हापुरात दाखल होणार आहेत. निवडणूक प्रचार त्यातच दिवाळी सुट्टीमुळे शहरात वाहतुकीचा भार वाढला आहे.

                                                                 जेवणही वेळेत नाही
विविध पक्षाचे प्रमुख नेते, राज्य व केंद्रातील मंत्री प्रचारासाठी दाखल होत आहेत. मतदार संघातील जाहीर सभा, विविध पक्षांचा प्रचार संपेपर्यंत पोलिसांना नेमून दिलेल्या बंदोबस्तावरून हलताही येत नाही. त्यामुळे वेळेत जेवणही मिळत नसल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.

                                                                   रात्र गस्तीमध्ये वाढ
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांच्या रात्र गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी रोकड व मद्याची तस्करी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी शहरासह जिल्ह्यातील सीमा नाक्यावर तपासणीसाठी पोलिसांना खडा पहारा दिला जात आहे. त्याचबरोबर संशयास्पद व रेकॉर्डवरील गुंडावर बारीक लक्ष ठेवावे लागत आहे.

                                                                   सायबर ब्रँच अलर्ट
निवडणूक काळात सोशल मीडियावरून अपप्रचार व बदनामीकारक मजकूर व्हायरल करण्याचे प्रकार वाढतात. यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था बिघडते. काहीवेळा अफवाही पसरवल्या जातात. यासाठी सायबर क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करडी नजर आहे.

                                                           पोलिसांच्या कारवाईचा धडाका
निवडाणुकीची आचारसंहिता लागताच पोलिसांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुटखा, मद्य, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गंभीर गुन्हे दाखल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जात आहे. गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुध्द कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नाकाबंदी, जिल्ह्याच्या सीमा भागावर कडक तपासणी, बंदोबस्त व गुन्हेगारांच्या तपासाची चक्रे अधिक गतीमान करण्यात आली आहेत.

तस्करी, गुन्हेगारांच्या टोळ्या, काळेधंदेवाल्यांच्यावर करडी नजर
गुटखा, अंमली पदार्थ, देशी, विदेशी दारू तस्कर, काळेधंदेवाले याच्या हालचालीवरही पोलिसांच्या विशेष पथकाची करडी नजर ठेवण्यात आली आहे. निवडणूक काळात नागरिकांमध्ये दहशत, भिती व दादागीरी करणाऱ्या सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुध्द कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. समाजकंटकांविरोधातील कारवाईसाठी शहर, जिह्यात अधिकारी, पोलिसांची विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
                                                       महेंद्र पंडित, पोलीस अधिक्षक

Advertisement
Tags :

.