कोनेवाडी भगवा ध्वज प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याची साक्ष
बेळगाव : कोनेवाडी गावात भगवा ध्वज फडकावून जय महाराष्ट्र अशी घोषणा देण्यासह सोशल मीडियावर सदर पोस्ट अपलोड करून भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत काकती पोलिसांनी कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या खटल्याची सुनावणी सोमवारी चौथे जेएमएफसी न्यायालयात झाली. या खटल्यातील फिर्यादी काकतीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. आता या खटल्याची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे.
मनपासमोर लालपिवळा ध्वज फडकाविल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोनेवाडी गावात दाखल होत त्या ठिकाणी भगवा ध्वज फडकाविला. तसेच जय महाराष्ट्र अशी घोषणा देऊन सदर पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. कन्नड व मराठी भाषिकांत द्वेष निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सोमवारी सुनावणीवेळी फिर्यादी व काकतीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली. यावेळी न्यायालयात प्रकाश शिरोळकर, महेश टंगसाळे उपस्थित होते. बचावपक्षातर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचण्णावर काम पाहत आहेत.