For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस अधिकारी सचिन सावंत यांना गृह मंत्रालयाचे पोलीस पदक

पोलीस अधिकारी सचिन सावंत यांना गृह मंत्रालयाचे पोलीस पदक
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी : पोलीस सेवेत तब्बल २५ वर्षे कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणारे पोलीस निरीक्षक सचिन चंद्रकांत सावंत यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत स्वातंत्र्यदिन २०२६ निमित्त भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाकडून त्यांना अति उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या सन्मानामुळे सिंधुदुर्गातील देवसू-दाणोली पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

सध्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन सावंत यांचे जन्मगाव देवसू, ता. सावंतवाडी आहे. त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले. २०१० मध्ये एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पोलीस उप निरीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर नाशिक शहर क्राईम ब्रँच, नवी मुंबई, महामार्ग सुरक्षा पथक यासह विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांचे पोलीस निरीक्षक पदावर प्रमोशन झालेले आहे.

सचिन सावंत यांचे वडील चंद्रकांत सावंत हे देखील पोलीस दलात सहाय्यक पोलीस उप निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जनसेवेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. याच संस्कारांच्या जोरावर त्यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करत पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली.

Advertisement

खून, घरफोडी, चोरी तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास करून त्यांनी गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चाळीसगाव महामार्ग केंद्र येथे कार्यरत असताना सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखालील कारवाईत ४३ किलो वजनाचे Methamphetamine (Psychotropic Substance), ज्याची किंमत तब्बल ६४ कोटी ९८ लाख रुपये होती, जप्त करण्यात आले. या धडाकेबाज कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला.

नाशिक शहरातील Anti Human Trafficking Unit येथे २०१८ ते २०२१ या कालावधीत कार्यरत असताना त्यांनी बेपत्ता व अपहृत मुलांच्या शोधासाठी विशेष प्रयत्न केले. या काळात १६० हून अधिक अपहृत मुलांचा शोध घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या कामगिरीमुळे अनेक कुटुंबांना पुन्हा आपल्या मुलांचा आधार मिळाला.

कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असताना त्यांनी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. कोरोनाबाधित ६० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यांची उकल करण्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला.

कर्तव्य बजावताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची पोचपावती म्हणून सचिन सावंत यांना सेवाकाळात तब्बल २५० बक्षिसे आणि 20 प्रशंसापत्रे प्राप्त झाली आहेत. कर्तव्याप्रती निष्ठा, शिस्त, धाडसी निर्णयक्षमता आणि सेवाभाव या गुणांमुळे त्यांनी पोलीस दलात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या २५ वर्षांच्या उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेला भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने स्वातंत्र्यदिन २०२६ निमित्त अति उत्कृष्ट सेवेसाठी पदक देऊन गौरविले, ही देवसू गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. सचिन सावंत यांच्या या उल्लेखनीय सन्मानामुळे देवसू-दाणोली पंचक्रोशीची मान उंचावली असून, त्यांच्या पुढील सेवाकालासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा आणि अभिनंदन व्यक्त होत आहे.

Advertisement
Tags :

.