For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस अधिकारी पाहुणे; परिणामी तपासाचे रडगाणे!

11:10 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोलीस अधिकारी पाहुणे  परिणामी तपासाचे रडगाणे
Advertisement

पोलीस गुंतलेत निवडणूक बंदोबस्तात : एकाही गुन्हेगारी प्रकरणाचा तपास नाही, सीसीटीव्ही फुटेजही बिनकामाचे

Advertisement

बेळगाव : पोलीस यंत्रणा निवडणूक बंदोबस्तात गुंतली आहे. त्यामुळे बेळगाव शहर व उपनगरात झालेल्या प्रमुख गुन्हेगारी प्रकरणांचा तपास रखडला आहे. ज्यांच्या घरात चोरी झाली आहे, ते चोरीचा छडा लागेल, या आशेवर जगत आहेत. मात्र, गेल्या दीड-दोन महिन्यांपासून तपासकामे ठप्प झाली असून एकाही प्रमुख प्रकरणाचा छडा लागला नाही. बेळगाव शहरात आंतरजिल्हा व आंतरराज्य गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. रोज नवनवीन गुन्हेगारी टोळ्या गुन्ह्यासाठी बेळगावात येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील एक-दोन अपवाद वगळता बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागेवर जे अधिकारी रुजू झाले आहेत, ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा आपापल्या मूळ जागेवर जाणार आहेत. त्यामुळे त्यांना तपासाचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.

गुन्हेगार सापडले की लगेच कळवतो!

Advertisement

गेल्या महिन्यात तर गुन्हेगारांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. महिन्याभरात सुमारे 15 हून अधिक ठळक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. यापैकी बऱ्याच प्रकरणांचा तपास लागला नाही. नागरिकांना पोलीस स्थानकाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. तुमचेच काम सुरू आहे, तपास सुरू आहे, गुन्हेगार सापडले की लगेच तुम्हाला कळवतो, असे सांगत त्यांना घरी पाठविण्यात येत आहे. 8 मार्च रोजी जाधवनगर येथील मंजुनाथ कमकेरी यांचा फ्लॅट फोडून 1 लाख 60 हजार रुपये रोकड व 13 ग्रॅमची अंगठी असा सुमारे 2 लाखांचा ऐवज लांबविण्यात आला होता. दुसऱ्याच दिवशी 9 मार्च रोजी सकाळी 6 वाजता अशोकनगर येथील आपल्या घरासमोर सडारांगोळी करणाऱ्या लक्ष्मी बसवराज शिरसंगी या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील चेन व मंगळसूत्र पळविण्यात आले होते. 9 मार्च रोजी डॉलर्स कॉलनी शाहूनगर येथे चोरीची मोठी घटना घडली. उद्योजक मनोहर यळ्ळूरकर यांच्या बंद घराच्या खिडकीची काच फोडून चोरट्यांनी 25 लाख रुपये रोकड पळविली आहे. सकाळी 11.45 ते 12 या केवळ पंधरा मिनिटांच्या वेळेत चोरीची ही घटना घडली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेला महिना उलटला तरी अद्याप सुगावा लागला नाही.

कनिष्ठ तपास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

10 मार्च रोजी सकाळी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील चंदन होसूर येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या शोभा नागाप्पा तवगद या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिचे मंगळसूत्र पळविण्यात आले होते. सकाळी 6 वाजता ही घटना घडली होती. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल झाला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी प्रत्येक प्रकरणात जातीने लक्ष घालून पाठपुरावा करूनही कनिष्ठ तपास अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे एकाही प्रकरणाचा छडा लागत नाही अशी स्थिती आहे. 13 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता सदाशिवनगर येथील लक्ष्मी कल्लाप्पा किल्लीकेतर ही महिला दळप आणण्यासाठी गिरणीला गेली होती. गिरणीहून घरी परतताना दुचाकीवरून आलेल्या एका भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन पलायन केले होते. त्याच दिवशी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. या एका प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

सम्मनअहमद रियाजअहमद नकारची (वय 28) रा. संगमेश्वरनगर याला 15 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे. ही एक घटना वगळता इतर कोणत्याच प्रकरणाचा छडा लागला नाही. या पाठोपाठ 18 मार्च रोजी सदाशिवनगर स्मशानभूमीजवळील अय्यंगार बेकरीचे शटर उचकटून 1 लाख 20 हजार रुपये रोकड लांबविण्यात आली होती. या प्रकरणाचाही अद्याप तपास लागला नाही. 18 मार्च रोजी गंगाधरनगर शिंदोळी येथील गंगव्वा निलप्पगोळ यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून 18 तोळ्यांचे दागिने पळविण्यात आले आहेत. या प्रकरणाचाही छडा लागला नाही. 11 एप्रिल रोजी मध्यरात्री अलारवाड ब्रिजजवळ आयशर ट्रक उभी करून लघुशंकेला गेलेल्या दीपक संजीवगोळ या चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील मोबाईल संच, साडेचार हजार रुपये रोख रक्कम, एटीएम कार्ड पळविण्यात आले होते. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. या प्रकरणाचेही धागेदोरे अद्याप सापडले नाहीत.

चोरटा चार महिन्यांपासून मोकाटच

एखादी चोरीची घटना घडली की पोलीस ‘तुम्ही सीसीटीव्हीचे कॅमेरे का लावले नाहीत? तुमच्या सुरक्षेची तुम्हालाच काळजी नाही’, असे दरडावतात. गेल्या दीड-दोन महिन्यात बेळगाव शहर व उपनगरात अनेक गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेल्या संशयितांचे फुटेज मिळूनही त्यांचा तपास लागत नाही, अशी स्थिती आहे. डिसेंबर 2023 मध्ये एका गुन्हेगाराने आनंदनगर-वडगाव, शहापूर, अनगोळ परिसरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. याच काळात आनंदनगर परिसरात तो गस्तीच्या पोलिसांच्या जाळ्यातही अडकला होता. मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो निसटला. तो गुन्हेगार सोलापूरचा आहे. केवळ बेळगावच नव्हे तर विजापूर, हुबळी-धारवाडसह कर्नाटकातील वेगवेगळ्या जिल्ह्यात त्याने चोऱ्या केल्या आहेत. तब्बल चार महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी पोलीस यंत्रणेला त्याचा थांगपत्ता लागला नाही. या गुन्हेगाराविषयी संपूर्ण माहिती मिळूनही त्याचा शोध घेण्यात पोलीस दलाला अपयशच आले आहे. केवळ पंधरा दिवसात पंधराहून अधिक घरफोड्या करणाऱ्या सोलापूरच्या गुन्हेगाराचा शोध कधी घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Tags :

.