जान्हवी कंडुला मृत्यूप्रकरणी पोलीस अधिकारी बडतर्फ
लास व्हेगास :
अमेरिकेच्या सिएटलमध्ये पोलीस वाहन दुर्घटनेत भारतीय विद्यार्थिनी जान्हवी कंडुलाच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर अधिकारी केविन डेव याला सिएटल पोलीस विभागाने बडतर्फ केले आहे. 23 वर्षीय जान्हवी ही आंध्रप्रदेशची रहिवासी होती, 23 जानेवारी 2023 रोजी रस्ता ओलांडताना पोलिसांच्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झाली होती. ड्रग ओव्हरडोसच्या कॉलला प्रतिसाद देत अधिकारी डेव हे 119 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने कार चालवत होते, त्यांच्या गस्त वाहनाने जान्हवीला धडक दिल्याने ती 100 फूट अंतरावर जाऊन कोसळली होती. सिएटल पोलीस प्रमुख सू राहर यांनी केविन डेव याला बडतर्फ करण्यात आल्याची घोषणा केली. काही महिन्यांपूर्वी सिएटलचे अन्य पोलीस अधिकारी डॅनियल ऑडरर याला जान्हवीच्या मृत्यूनंतर असंवेदनशील टिप्पणी आणि हसल्यामुळे नोकरीतून काढळून टाकण्यात आले होते. पोलीस विभागाकडून जारी बॉडीकॅम फुटेजमध्ये ऑडरर घातक दुर्घटनेनंतर हसताना दिसून आला होता. केवळ एक चेक लिहून द्या, 11 हजार डॉलर्स, मृत युवती 26 वर्षांची होती, तिचे मर्यादित मूल्य होते, असे ऑडररने दुर्घटनेनंतर म्हटले होते. या पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे सिएटल पोलीस विभाग आणि आमच्या पूर्ण पेशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला असल्याचे राहर यांनी नमूद केले.