एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ‘ई-बीट’ व्यवस्था
‘आसरा’ योजना ठरतेय प्रभावी : जिल्ह्यात 214 ज्येष्ठ नागरिक
बेळगाव : राज्यातील एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कर्नाटक पोलिसांनी राबविलेली ‘आसरा’ योजना प्रभावी ठरत आहे. या माध्यमातून हजारो ज्येष्ठांना दिलासा मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ई-बीट केंद्रांची स्थापना करून पोलिसांनी नागरिकांभिमुख सेवेला नवे रुप दिले आहे. या सर्वेक्षणामुळे एकटे राहणाऱ्या 60 वर्षांवरील नागरिकांची अचूक माहिती पोलिसांकडे उपलब्ध आहे. बेळगाव जिल्ह्यात 214 ज्येष्ठ नागरिक घरी एकटे वास्तव्य करत असून ई-बीटच्या माध्यमातून पोलिसांकडून त्यांना मदत मिळत आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक मुलांपासून दूर किंवा एकटे राहतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ‘आसरा’ योजना सुरू करून ज्येष्ठांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत पोलीस अधिकारी नियमितपणे ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देतात. त्यांच्या भेटीचा संपूर्ण तपशील ई-बीट प्रणालीमध्ये नोंदविला जातो. या भेटीची माहिती संबंधित ज्येष्ठांच्या मुलांना किंवा कुटुंबीयांना स्वयंचलित संदेशाद्वारे पाठविली जाते.
17 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत राबविण्यात आलेल्या या राज्यव्यापी उपक्रमात सुमारे 20,459 घरांची ओळख पटविण्यात आली आहे. या सर्वेक्षणामुळे एकटे राहणाऱ्या 60 वर्षांवरील नागरिकांची अचूक माहिती पोलिसांकडे उपलब्ध झाली आहे. त्यानुसार त्यांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांची वैयक्तिक माहिती, संपर्क क्रमांक, आरोग्यविषयक माहिती तसेच त्यांच्या मुलांचे व नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक संकलित केले जातात. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधणे शक्मय होत आहे.
यापूर्वी उडुपी, हासन आणि म्हैसूर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले होते. त्या अनुभवाचा लाभ घेत ‘आसरा’ योजना अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात आली आहे. स्थानिक पोलीस केवळ भेटी देण्यापुरते मर्यादित न राहता ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांकडे नेणे, ऊग्णालयीन सेवा मिळवून देणे, औषधांची व्यवस्था करणे अशा प्रकारे मदत करत आहेत. पोलिसांच्या नियमित संपर्कामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामे करण्यासाठी मदत मिळत असून त्यांचे जीवन अधिक सुलभ झाले आहे.