Solapur : सोलापुरात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिसांनी लावले रिफ्लेक्टर
सिद्धनाथ साखर कारखान्यात ऊस वाहतूक वाहनांची तपासणी
उत्तर सोलापूर : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस वाहतूक शाखेने उत्तर सोलापूर तालुक्यातील तिहे येथील सिद्धनाथ साखर कारखाना येथे भेट देत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन वाहनांना रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळकर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या टीमने ही कारवाई केली. कारखान्यात येणाऱ्या ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर आणि बैलगाडी चालकांची वाहतूक जनजागृती बैठकआयोजित करण्यात आली. बैठकीत वाहतूक पोलिसांनी उपस्थितीत वाहन चालकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. हा उपक्रम रेझिंग डे निमित्ता राबविण्यात आला.
शाखेच्या यावेळी वाहतूक पोलिसांनी चालकांना चारित्र्यप्रमाणपत्र कार्यालयात जमा करणे, वाहनाचा विमा, परवाना, आधारकार्ड आदी कागदपत्रे सोबत ठेवणे अशा महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. चालत्या वाहनांवर मोठ्या आवाजात गाणी वाजवू नयेत आणि गरज भासल्यास डायल ११२ वर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय वाहतूक सुरक्षिततेसाठी वाहनांच्या पुढील व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे, त्यावर कारखान्याचे नाव, चालकाचा संपर्क क्रमांक आणि रक्तगट नमूद करणे बंधनकारक करण्यात आले. चालकांनी रिफ्लेक्टर जॅकेटचा वापर करावा, असेही निर्देश देण्यात आले. यावेळी हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड, सदाशिव केंद्रे, दिगंबर आकडे यांच्यासह अन्य वाहतूक पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.