For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्यटन व्यावसायिकांनी किनारपट्टीवर जीवरक्षकाची नियुक्ती करावी

05:01 PM Oct 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पर्यटन व्यावसायिकांनी किनारपट्टीवर जीवरक्षकाची नियुक्ती करावी
Advertisement

पोलीस निरीक्षकांच्या पर्यटन व्यावसायिकांना सूचना

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

तारकर्ली किनारपट्टी भागात पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने अपघात प्रवण क्षेत्रात पर्यटक जाऊ नयेत आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी किनारपट्टीवर जीवरक्षकाची नियुक्ती करावी तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे अशा सूचना पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी पर्यटन व्यावसायिकांना दिल्या. दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाईल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.समुद्रातील वादळ सदृश परिस्थिती, पर्यटकांची सुरक्षितता, वाहतूक कोंडी या विषयांच्या अनुषंगाने आज पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी तारकर्ली येथे बैठक घेत पर्यटन व्यावसायिकांना सूचना दिल्या. यावेळी पोलीस कर्मचारी सुशांत पवार, सरपंच मृणाली मयेकर, वैभव सावंत, प्रतीक कुबल, एमटीडीसीचे व्यवस्थापक सिद्धेश चव्हाण यांच्यासह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते. सध्या दिवाळी सुट्टीचा हंगाम असल्याने किनारपट्टी भागात पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांना समुद्राचे आकर्षण असल्याने पर्यटक समुद्रात समुद्र स्नानासाठी उतरतात. यात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू पावण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशा घटना या हंगामात घडू नये यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी तात्काळ किनारपट्टीवर जीवरक्षकाची नियुक्ती करावी अशा सूचना देण्यात आल्या. तारकर्ली मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या भासत असल्याने व्यावसायिकांनी पर्यटकांना चुकीच्या पद्धतीने वाहने उभी न करण्याच्या सूचना द्याव्यात. याची कार्यवाही न झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल अशा सूचनाही पोलिसांनी केल्या. सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे. यात वादळ सदृश परिस्थितीही आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता पर्यटन व्यवसायिकांनी आवश्यक खबरदारी घेतानाच पोलिसांनी केलेल्या सूचनांचे पालन करत सहकार्य करावे असे आवाहन श्री. जगताप यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.