For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पोलिस निरीक्षक देयेकरसह साथ देणाऱ्या महिलेला अटक

09:40 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोलिस निरीक्षक देयेकरसह साथ देणाऱ्या महिलेला अटक
Advertisement

पणजी: रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रांच) मुख्य कार्यालयातच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेचे निलंबित पोलिस निरीक्षक विकास देवकर आणि या गुन्ह्यात त्याला साथ देणारी महिला संशयित रंजिनी पालेकर यांना जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानेच आपल्या पदाचा आणि सरकारी कार्यालयाचा गैरवापर करून हे कृत्य केल्यामुळे संपूर्ण गोव्यात खळबळ उडाली आहे.

Advertisement

याबाबत माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी ही एका जुन्या प्रकरणात चौकशी आणि मदतीसाठी रायबंदर येथील क्राईम ब्रांचच्या कार्यालयात आली होती. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत संशयित पोलिस निरीक्षक विकास देयेकर याने पीडितेवर २५ जुलै आणि २७ ऑक्टोबर २०२६ अशा दोन वेगवेगळ्या तारखांना गुन्हे शाखेच्या केबिनमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या गुन्ह्यात रंजिनी पालेकर या महिलेने पीडित मुलीला देयेकरच्या जाळ्यात ओढण्यासाठी आणि या संपूर्ण कृत्याला खतपाणी घालण्यासाठी मध्यस्थाची मुख्य भूमिका बजावल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून संशयित आरोपीने कृत्य करण्यापूर्वी क्राईम ब्रांचच्या पीआय केबिनबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दिशेत फेरबदल केल्याचा किंवा ते कॅमेरे कापडाने झाकल्याचा धक्कादायक संशयही पोलिसांना आहे. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून जुने गोवे पोलिस ठाण्यात ३० ऑक्टोबर रोजी भारतीय न्याय संहिता आणि 'पॉक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य आणि जनतेमधील वाढता रोष लक्षात घेऊन राज्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी तात्काळ कारवाई करत पीआय विकास देयेकर याला पोलिस सेवेतून निलंबित केले होते. तेव्हापासून पोलिस या दोघांवर पाळत ठेवून होते आणि अखेर ठोस पुराव्यांच्या आधारे जुने गोवे पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या. अटक केल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून वाचवण्यासाठी पोलिसांनी आरोपी देयेकर याला पोलिस ठाण्याच्या मागच्या दरवाजातून आत नेले. दरम्यान, या घटनेमुळे महिला आणि विविध सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली आहे. जुने गोवे पोलिस या प्रकरणाचा पुढील सखोल तांत्रिक आणि कायदेशीर तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.