'असहाय्यतेचा गैरफायदा घेत, चौकशीच्या बहाण्याने युवतीला थेट रात्रीच्या वेळी कार्यालयात बोलावले'; पोलीस निरीक्षकाचा कारनामा
पणजी: तीन वर्षांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) माध्यमाद्वारे अश्लील फोटो एडिट करून व्हायरल करणाऱ्या इसमाविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेचे (क्राईम ब्रांच) पोलिस निरीक्षक विकास देयकर यांनी केल्याचे समोर आले आहे. तिची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत, तिला चौकशीच्या बहाण्याने थेट गुन्हे शाखेच्या कार्यालयात रात्रीच्यावेळी बोलावून तिचा छळ करण्यात आला. या संतापजनक प्रकाराला कंटाळून अखेर पीडितेने एनजीओ संघटनेच्या मदतीने जुने गोवे पोलिसस्थानकात तक्रार दिली असून, पोलिसांनी निरीक्षक देयकर आणि त्याला साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीविरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करून कसून चौकशी सुरू केली आहे.
रायबंदर येथे गुन्हे शाखेच्या अधिकृत कार्यालयीन आवारात हा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. संशयित पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि 'पोक्सो' (लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा) या अत्यंत कडक कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय आणि वेगाने सुरू असून, संशयित पोलिस निरीक्षकावर विभागाकडून निलंबनाची कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पोलिस निरीक्षकाने पीडीतेचा गैरफायदा घेतल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. सुमारे तीन वर्षापूर्वी एका इसमाने संबंधित अल्पवयीन मुलीचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) माध्यमाद्वारे अश्लील फोटो चुकीच्या पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या छळाविरुद्ध त्या इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार देण्याच्या इराद्याने पीडितेने तीन वर्षांपूर्वी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देयकर यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, देयकर याने रीतसर गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी या परिस्थितीचा गैरफायदा घेतला आणि पीडित मुलीच्या मर्जीविरुद्ध तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला.
या कृत्यात देयकर याला त्याच्या एका मैत्रिणीने साथ दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या त्रासाची परिसीमा गाठली गेली ती गेल्या २५ ऑक्टोबर आणि २९ ऑक्टोबर २०२६ रोजी, जेव्हा संशयित निरीक्षक देयकर याने पीडित मुलीला चौकशीच्या बहाण्याने रात्रीच्यावेळी गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रांच) कार्यालयात बोलावून घेतले होते. पोलिस निरीक्षकाच्या या सततच्या छळाला आणि गैरवर्तनाला कंटाळून अखेर या युवतीने एनजीओच्या मदतीने जुने गोवा पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली आहे. पोलिस निरीक्षक विकास देयकर याच्यासह त्याला साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीचीही कसून चौकशी सुरू केली आहे.
