ईद-ए-मिलादनिमित्त शहरात पोलिसांचे पथसंचलन
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण उत्साहात आणि शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस खात्याकडून बुधवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विशेषकरून संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात पोलिसांची नजर असणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमनी यांच्या नेतृत्वाखाली केएसआरपी, सीएआर पोलिसांनी अनगोळ, बाजारपेठ आणि खडेबाजार परिसरात पथसंचलन केले.
ईद-ए-मिलाद सणावेळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलीस खात्याकडून खबरदारी घेण्यात आली आहे. विविध पोलीस स्थानकांच्या हद्दीत आवश्यक ठिकाणी पोलीस तैनात असणार आहेत. ईद पाठोपाठ गणेशोत्सवदेखील आहे. त्यामुळे सर्व सण उत्सव भक्तीमय वातावरणात पार पाडावेत यासाठी यापूर्वीच शांतता समिती बैठका घेऊन सूचना करण्यात आली आहे. कोणीही धार्मिक भावना किंवा सलोख्याला बाधा पोहचणार नाही यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन केले जात आहे.
समाजकंटकांना इशारा देण्यासाठी मंगळवारी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी शहरातील विविध भागात पथसंचलन पेले. यावेळी खडेबाजारचे साहाय्यक पोलीस आयुक्त शेखराप्पा एच., मार्केटचे साहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनाईक यांच्यासह पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक पथसंचलनात सहभागी झाले होते.