पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक सुतार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
दोडामार्ग – वार्ताहर
मूळ पाटये पुनवर्सन मधील आणि सध्या झरेबांबर येथे रहिवासी असलेले व दोडामार्ग पोलिस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले दीपक गुंडू सुतार यांचे आज गुरुवारी सकाळी ९ वाजता हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या या अचानक निधनाने दोडामार्ग पोलिस ठाण्यात तसेच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिलेली माहिती अशी की, दीपक सुतार हे आज सकाळी आपल्या ड्युटीवर आले असता त्यांच्या अचानक छातीत दुखायला सुरुवात झाली. त्यामुळे ते स्वतःच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालेत. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी म्हापसा आजिलो येथे रेफर केले. यावेळी दोडामार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे व अन्य पोलिस देखील उपस्थित होते. तोपर्यंत सुतार यांचे नातेवाईकही दोडामार्ग येथे आले होते. सुतार यांना पुढील उपचारासाठी आजिलो येथे रेफर केले होते मात्र त्यांना वाटेतच तीव्र हृदय विकाराचा धक्का आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या या अकाली निधनाने संपूर्ण तालुक्यात तसेच जिल्हा पोलिस दलात शोककळा पसरली आहे. दीपक सुतार हे १९९३ मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. त्यानंत्र जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यात आपली सेवा बजावली आहे. त्यांचा स्वभाव सर्वांशी मनमिळाऊ व मोठा मित्रपरिवार असल्याने अनेकांना शोक अनावर झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.