समाज कंटकांना पोलिसी हिसका
तब्बल 122 जणांवर गुन्हे नोंद : आणखी काहीजण रडारावर
पणजी : राज्यातील पोलिसांनी समाजकंटकांवर कारवाई करण्याची धडक मोहीम सुरु केली असून 14 पोलिसस्थाकांच्या हद्दीत 122 समाजकंटकांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. वाढते गुन्हे रोखण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे. 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर काळात 112 जणांवर ही कारर्वा झाली आहे. शांतता भंग करणे, वाद निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवणे अशा घटनांबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. समाजात कलह माजविणाऱ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री व पोलिस महासंचालकांनी कारवाईचे निर्देश दिले होते.
पोलिसांना आता आपापल्या हद्दीत केलेल्या कारवाईचा दर 12 तासांनी अहवाल सादर करण्याचे निर्देशही पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. उत्तर गोव्यातील चौदा पोलिसस्थानकांतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 126 अंतर्गत सर्वाधिक 68 जणांवर कारवाई झाली. कलम 35 अंतर्गत 19 जणांवर तर कलम 170 अंतर्गत 22 जणांवर कारवाई केली आहे. कलम 128 अंतर्गत 13 जणांवर कारवाई झाली. आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत. किनारी भागांमधील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी नियुक्तीस असलेल्या पोलिसांपैकी 40 टक्के पोलिस हे रात्री गस्तीवर असतील. अन्य भागात पोलिसांची संख्या रात्रीच्या गस्तीवर 30 टक्के केली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. त्याची अंमलबजावणी सुरु झालेली आहे.