कचेरी रोडवरील ‘वनवे’चा पोलिसांना विसर
वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप : पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : कचेरी रोडवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन अलिकडेच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कचेरी रोड वनवे घोषित करण्यात आला होता. मात्र पोलिसांकडून अंमलबजावणी होत नसल्याने वाहनचालक दोन्ही बाजूंने पुन्हा ये-जा करू लागले आहेत. परिणामी पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने वनवेचा विसर पडलेल्या पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी यासाठी पोलीस आयुक्त बोरसे यांनी वाहनचालकांवर स्पॉट फाईन घालणे बंद केले आहे. सीसी कॅमेरे त्याचबरोबर मोबाईलच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे नंबर टिपले जात आहेत. त्यानंतर संबंधितांना दंडाचे चलन पाठविले जात आहे. स्पॉट फाईन घालणे बंद झाले असल्याने वाहतूक पोलीस सध्या निवांत असल्याचे दिसून येत आहे. पण त्यांच्याकडून वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
शहरात वाहतूक व्यवस्थेचे अक्षरश: तीन तेरा
वाहनचालक वनवेतून बिनधास्तपणे वाहने हाकत आहेत. त्यामुळे शहरात अक्षरश: वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा उडाले आहेत. यापूर्वीच्या वनवे मार्गावर पोलिसांची नियुक्ती होत नाही. असे असताना अलिकडेच पोलीस आयुक्तांनी कचेरी रोड वनवे म्हणून घोषित केला आहे. पण त्या ठिकाणीही पोलीस राहत नसल्याने वाहने दोन्ही बाजूंकडून ये-जा करीत आहेत. या ठिकाणी शनिवार खूट, जुने तहसीलदार कार्यालय, नाड कचेरी, जिल्हा पंचायत पुढे तालुका पंचायत, उपनोंदणी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, लोकायुक्त कार्यालय, सार्वजनिक माहिती व प्रसार कार्यालय यासह इतर व्यावसायिक अस्थापने आहेत. त्यामुळे दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. एकेरी वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा कचेरी रोडवर वाहतूक कोंडी होत आहे.