पोलीस भरतीची शेवटची संधी! पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची माहीती
एकाच दिवशी किंवा लागोपाठच्या दिवशी मैदानी चाचणीस राहण्यास अडचण आलेले; तांत्रिक कारणामुळे प्रवेशपत्र न मिळालेले
कोल्हापूर प्रतिनिधी
कसबा बावडा येथील पोलीस मुख्यालयाच्या पोलीस परेड मैदानावर जिल्हा पोलीस दलातील 213 रिक्त पदाच्या भरती प्रक्रियेला 19 जून पासून सुरूवात झाली आहे. रिक्त 213 जागासाठी 11 हजार 445 उमेदवारांचे अर्ज आले आहे. यापैकी पोलीस शिपाईपदाच्या 154 जागासाठी 6777 तर पोलीस शिपाई चालक पदाच्या 59 जागासाठी 4668 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. पोलीस परेड मैदानावर 19 जून पासून पोलीस शिपाई आणि चालक शिपाई पदाकरीता दाखल केलेल्या उमेदवारांची शारिरीक व मैदानी चाचणी घेण्यात येत आहे.
उमेदवारांच्या शारिरीक व मैदानी चाचणी वेळी, एका किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज केलेल्या काही उमेदवारांना एकाच दिवशी किंवा लागोपाठच्या दिवशी दोन पदाकरीता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्यास अडचण आली होती. त्या उमेदवारांना त्यांच्या निश्चित केलेल्या मैदानी चाचणीच्या दिनांका व्यतिरिक्त अन्य दिनांकास हजर राहण्याबाबतची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे.
त्यामुळे पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदासाठी अर्ज दाखल केलेल्या पैकी, काही उमेदवारांना दुसऱ्या घटकात मैदानी चाचणी असल्याने अथवा तांत्रिक कारणामुळे प्रवेशपत्र उपलब्ध न झालेल्या, सर्व उमेदवारांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शारिरीक व मैदानी चाचणीची अंतीम संधी उपलब्ध कऊन दिली आहे. त्यामुळे संबंधीत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह 28 जून रोजी पहाटे पाच वाजता शारिरीक व मैदानी चाचणीसाठी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या कसबा बावडा येथील पोलीस परेड मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.