होळी-रंगोत्सवासाठी पोलीस दलाकडून आचारसंहितेचे मार्गदर्शन
सीसीटीव्ही-ड्रोन कॅमेऱ्यांची राहणार नजर : एक हजाराहून अधिकारी-पोलीस शहरात तैनात
बेळगाव : होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व उपनगरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांचे लक्ष असणार आहे. रंगाचा बेरंग होईल, असे कृत्य कोणी करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले आहे. रविवारी बंदोबस्तासंबंधीची माहिती दिली आहे. बेळगाव शहर व उपनगरात 329 ठिकाणी होळीदहनाचा कार्यक्रम होतो. 180 हून अधिक ठिकाणी रंगोत्सव साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर सोमवार व मंगळवारी 1 हजारहून अधिक अधिकारी व पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यावर असणार आहेत. मदतीला गृहरक्षक दलाचे 250 जवान असणार आहेत. राज्य राखीव दलाच्या 7, शहर सशस्त्र दलाच्या 10 तुकड्या बंदोबस्तात असणार आहेत. मदतीसाठी अग्निशमन दल, एसडीआरएफचे पथक असणार आहे.
19 चेकपोस्ट उभारून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. उत्सवाच्या काळात नशेत वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. होळी व रंगोत्सव शांततेत पार पडावे यासाठी 500 हून अधिक सीसीटीव्ही, 8 ड्रोन कॅमेरे व बॉडीवोर्न कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांचे लक्ष असणार आहे. रंग खेळताना नैसर्गिक रंगांचा वापर करावा. जबरदस्ती कोणावरही रंग फेकू नये. वाहतुकीला अडथळा होईल अशी कृती करू नये. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे कर्कश आवाजाने साऊंड सिस्टीम लावू नये, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे. साऊंड सिस्टीम लावताना पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे. केवळ 75 डेसिबल इतक्या आवाजाला परवानगी असणार आहे. यापेक्षा जास्त आवाजात गाणी लावणाऱ्यांवर सणानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा देतानाच मदतीसाठी किंवा एखादी घटना घडल्यास 112 शी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीस आयुक्तांनी केले आहे.