बाजारपेठेत वावरणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष
बाजारपेठेत वाढती गर्दी : पोलिसांची गस्त वाढविली : नागरिकांनीही सावध राहण्याचे आवाहन
बेळगाव : दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. गर्दीचा फायदा घेत पाकिटमारी करणारे व मोबाईल पळविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी यंदा बाजारपेठेत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड गर्दीतही पाकिटमारीच्या घटना घडल्या आहेत. गणेशोत्सव, दसरा, दिवाळी कोणतेही सण असोत. शेवटचे आठ दिवस बाजारपेठेत गर्दी असते. सण जवळ येईल तसे ही गर्दी वाढते. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे पोलीस दलाला कठीण होते. म्हणून बाजारपेठेत ऑटोरिक्षा, कार किंवा इतर अवजड वाहनांना गर्दीच्या वेळी प्रवेशबंदी केली जाते. गेल्या वर्षी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी व राज्योत्सव मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात पाकिटमारी व मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या.
पूर्वानुभव लक्षात घेऊन खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी यांनी गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत पोलिसांची गस्त वाढवली आहे. गर्दीच्या वेळी स्वत:ही गस्त घालत आहेत. खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्लीसह बाजारपेठेतील इतर भागात गर्दीच्या वेळी गुन्हेगारांची वर्दळ असतेच. चार दिवसांपूर्वीच पांगुळ गल्ली येथील दुकानात चोरी करताना गँगवाडी परिसरातील तीन महिलांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. या घटनेनंतर लगेच बाजारपेठेत पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्योत्सव मिरवणुकीत दीडशेहून अधिक मोबाईल पळविल्याच्या घटना घडल्या होत्या. शनिवार व रविवार विकेंडमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती. मात्र, पोलिसांची गस्त वाढल्यामुळे या तीन दिवसात एकही घटना घडली नाही. मार्केट पोलिसांनीही आपल्या कार्यक्षेत्रात गस्त वाढवली आहे.
स्वत:ही लक्ष ठेवणे गरजेचे
पोलिसांची गस्त वाढवली असली तरी गर्दीच्या वेळी खरेदीसाठी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांनी आपले मोबाईल, पर्स, व्हॅनिटी बॅगची स्वत:च काळजी घ्यायची आहे. गर्दीत आपल्या वस्तूवरील लक्ष थोड्या वेळासाठी जरी हटले तरी त्याच संधीचा फायदा घेत गुन्हेगार वस्तू पळवतात. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ही खबरदारी घेण्याचे आवाहन करतानाच बाजारपेठेत संशयास्पदरीत्या फिरणाऱ्यांविषयी माहिती देण्याचे आवाहन खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी यांनी केले आहे.