For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरात खोल खड्डा; हिर्लोक गावात अघोरी पूजा ,देवदेवस्कीचा प्रकार ?

11:43 PM Dec 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
घरात खोल खड्डा  हिर्लोक गावात अघोरी पूजा  देवदेवस्कीचा प्रकार
Advertisement

पोलिसांची घटनास्थळी धाव : काहीजण चौकशीसाठी ताब्यात

Advertisement

प्रतिनिधी
कुडाळ
तालुक्यातील हिर्लोक गावातील एका घरात मोठा खड्डा खोदण्यात आला असून त्या ठिकाणी अघोरी पूजा वा ‘देवदेवस्की’चा प्रकार करण्यात येत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असून याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी याबाबतची माहिती कुडाळ पोलिसांना दिली. लागलीच कुडाळ पोलीस व जिल्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.रात्रीच्या वेळी घरात मोठा खड्डा खोदला असून तेथे अघोरी पूजा, देवदेवस्की करण्यात येत असावी, असा संशय स्थानिकांना आहे. या प्रकरणी काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, यामुळे हिर्लोक गावासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रकार किंवा नरबळीसारखा प्रकारही असण्याची शक्यता असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याबाबत पोलीस व ग्रामस्थांना हा नक्की प्रकार काय आहे, याची अद्याप फारशी माहिती उपलब्ध झालेली नाही. एका स्थानिक तरुण व महिलेसह चार ते पाचजणांचा यात सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  हिर्लोक गावात पाच-सहा महिन्यांपासून इंदिरा आवास घरकुल योजनेच्या एका घरात बाहेरच्या गावातील तीन-चारजण ये-जा करीत होते. त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ती महिला मालवण तालुक्यातील असल्याची चर्चा आहे. बाहेरगावातील या संशयित व्यक्ती त्या बंद घरात रात्रीच्या वेळी पूजाअर्चा करीत असत.

घरात खोल खड्डा : पूजा साहित्य
विशेष म्हणजे त्या घरात संशयितांनी आठ ते नऊ फूट खोल व सहा फूट रुंद खड्डाही खोदल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या ठिकाणी पूजेचे साहित्य, दोरे, बाहुली, लिंबू, अबीर, बुका, शेंदूर अशा वस्तू आढळल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांना संशय आल्याने काही सूज्ञ ग्रामस्थांनी गावातील प्रमुख मंडळींना याची कल्पना दिली. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी याबाबत कुडाळ पोलिसांना माहिती देण्यात आली. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्या बंद घरात एका महिलेसह पाच सदस्य पूजाअर्चा करीत असताना आढळून आल्याचे सांगण्यात आले. यावेळी पूजेच्या साहित्यासह संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कुडाळ पोलीस स्थानकात आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या घटनेची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहाण्यी शक्यता आहे.

Advertisement

Advertisement

.