For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकेरी वाहतूक रस्त्यांवर पोलिसांची नियुक्ती

10:59 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
एकेरी वाहतूक रस्त्यांवर पोलिसांची नियुक्ती
Advertisement

अपुऱ्या संख्येमुळे कायमस्वरुपी नेमणूक अशक्य : नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागणार 

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरांतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस दलाने आठ प्रमुख रस्त्यांवर एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी रोज सकाळी व सायंकाळी त्या-त्या रस्त्यांवर पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांची संख्या लक्षात घेता एकेरी वाहतुकीच्या मार्गावर रोज पोलीस तैनात करणे शक्य होणार नाही. त्यामुळे नागरिकांनाच वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

किर्लोस्कर रोड, केळकर बाग, अनसूरकर गल्ली, रामदेव गल्ली, गणपत गल्ली, कलमठ रोड, नेहरुनगर दुसरा व तिसरा क्रॉसवर एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करण्यासंबंधी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी आदेश लागू केला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या सूचनेवरून गेल्या चार दिवसांपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे.

Advertisement

किर्लोस्कर रोड, केळकर बाग, रामदेव गल्ली, अनसूरकर गल्ली, गणपत गल्ली परिसरात एकेरी वाहतुकीचा नियम यापूर्वीही लागू होता. आता नव्याने आदेश लागू करण्यात आला आहे. एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करण्यासाठी रोज वाहतूक पोलीसही तैनात करण्यात येत आहेत. मात्र, पोलिसांची संख्या मर्यादित असल्यामुळे रोजच या रस्त्यांवर नेमणूक करणे शक्य होणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनीच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागणार आहे.

एकेरी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईचा इशारा

बेलट्रॅक योजनेंतर्गत शहरातील सर्व प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या घरी नोटिसा पाठवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. एकेरी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.