सोडून दिलेली नादुरुस्त वाहने पोलीस खाते हटविणार
रस्त्याशेजारी वर्षानुवर्षे पडून असल्याने अडथळा
बेळगाव : नादुरुस्त वाहने वर्षानुवर्षे रस्त्याशेजारी उभी करणाऱ्यांविरुद्ध बेळगाव पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. अशी वाहने तेथून हलविण्यासाठी पोलीस दलाच्या समाजमाध्यम प्लॅटफॉर्मवर अशा वाहनांचे फोटो पाठविण्याचे आवाहन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले आहे. शहर व उपनगरात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याशेजारी अनेक नादुरुस्त वाहने उभी करण्यात आली आहेत. या वाहनांमुळे वाहतुकीलाही अडथळा होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन अशी वाहने उचलून पोलीस स्थानकात आणण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याकामी बेळगावकरांनी अशा वाहनांची छायाचित्रे व ठिकाण पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव शहर व उपनगरात अशी अनेक वाहने गेले काही महिने, काही वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी उभी आहेत. ती नादुरुस्त असल्यामुळे या वाहन मालकांचेही त्याकडे लक्ष रहात नाही. अशी वाहने वाहतुकीला अडथळे ठरतात. मात्र, ती हलवणार कोण? असा प्रश्न होता. आता यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेतला आहे.