Satara Crime | उंब्रजमध्ये मटका जुगारावर पोलिसांची धडक कारवाई; चार ठिकाणी छापे
उंब्रजमध्ये चार जुगार प्रकरणे उघड;
उंब्रज - उंब्रज परिसरात बेकायदेशीर मटका जुगारावर अखेर पोलीसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. उंब्रज पोलीस ठाण्याचा नुकताच कार्यभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पदभार स्विकारताच अवैध धंद्यांविरोधात कडक भूमिका घेत शनिवारी (दि. २८) सायंकाळी सलग धाडसत्र राबवत चार वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. या कारवाईमुळे मटका व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बाजारतळावर पहिली कारवाई...
पोलीस कॉन्स्टेबल अनिल देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी सुमारे ५.१२ वाजता बाजारतळावरील पिंपळाच्या झाडामागे अस्लम सतार मुल्ला (रा. उंब्रज) हा त्याचा हस्तक संभाजी दाजीराम जाधव (वय ४८, रा. चरेगाव) याच्या माध्यमातून कल्याण’ नावाचा मटका जुगार चालविताना रंगेहात सापडला. दोघांकडून मटक्याचे अंक व रक्कम नमूद असलेले स्लिपबुक आणि १,१२० रुपये रोख जप्त करण्यात आले. दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाण्याच्या टाकीजवळ दुसरी कारवाई
दुसऱ्या कारवाईत पो. कॉ. रविंद्र चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार सायंकाळी ५.१५ वा. बाजारतळावरील पाण्याच्या टाकीजवळ अस्लम सतार मुल्ला हा त्याचा हस्तक सुरेश शंकर कांबळे (वय ५८, रा. संत रोहीदासनगर, उंब्रज) याच्यामार्फत मटका चालविताना आढळला. याठिकाणी स्लिपबुकसह २,५३० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
मच्छी मार्केटमध्ये तिसरी कारवाई पो.का. सयुर महादेव देशमुख (प्रतिनियुक्ती, कराड विभाग) यांच्या फिर्यादीनुसार मच्छी मार्केट परिसरात राजेंद्र धोंडीराम जाधव (रा. उंब्रज) हा त्याचा हस्तक महेश गुलचंद पवार (वय ४५, रा. शिवाजीनगर, उंब्रज) याच्या मार्फत मटका जुगार चालविताना आढळला. तेथून जुगार साहित्य व २,५०० रुपये रोख जप्त करण्यात आले.
राज पानशॉपच्या आडोशाला चौथी कारवाई
पो.का. श्रीधर माने यांच्या फिर्यादीनुसार सायंकाळी ५.२० वा. बाजारतळावरील राज पानशॉपच्या आडोशाला राजेंद्र जाधव हा त्याचा हस्तक संजय लक्ष्मण चव्हाण (वय ५०, रा. उंब्रज) याच्या करवी मटका जुगार चालविताना मिळून आला. येथून जुगार साहित्य व २,३०० रुपये रोख जप्त करण्यात आले.
स
र्व प्रकरणांमध्ये संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास उंब्रज पोलीस करीत आहेत. नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे उंब्रज परिसरातील अवैध धंदेवाल्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून पोलीसांची मोहीम आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.