मेरवेवाडीत हुल्लडबाजीला पोलिसांचा चाप
कराड :
निसर्गरम्य ठिकाणी जाऊन अश्लील चाळे करण्यासह हुल्लडबाजी करणाऱ्यांना कराड उपविभागीय पोलिसांच्या निर्भया पथकाने सोमवारी कारवाईचा दणका दिला. तालुक्यातील मेरवेवाडी तलावाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने खळबळ उडाली. अनेक युवक, युवतींना पोलिसांनी जागीच कडक समज दिली तर यासंदर्भात त्यांच्या पालकांनाही त्या परिसरात बोलवून घेण्यात आले.
पावसाळा सुरू असल्याने कराड शहराच्या आसपासच्या निसर्गरम्य ठिकाणी अनेकांचा राबता असतो. सोमवारी मेरवेवाडी तलावाच्या परिसरात निर्जनस्थळी अनेक युवक नशा करताना आढळले. काही युवक तलावात उतरून नशा करत रिल्स बनवत होते. तर काही युवक आणि युवती झाडाझुडपात आडोशाला अश्लिल चाळे करत होते. यातून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना याची माहिती दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, निर्भया पथकाच्या दीपा पाटील, मयूर देशमुख, अमोल फल्ले यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी धोकादायक ठिकाणी थांबलेल्या प्रत्येकाला ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली. युवक, युवतींची चौकशी करून या ठिकाणी नेमके काय घडू शकते याची समज दिली. सर्वांच्या पालकांना पोलिसांनी यासंदर्भात कल्पना दिलाr. पालकही घटनास्थळी आले. गत मार्च महिन्यात रंगपंचमीला टेंभू परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी गेलेल्या एका युवतीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेत ही कारवाई केली.