पोलीस कॉन्स्टेबल आता ब्लू पीक कॅपमध्ये कार्यरत
बेंगळूर : पाच दशकांहून अधिक काळापासून स्लॉच हॅट्स परिधान करणाऱ्या राज्यातील पोलीस कॉन्स्टेबलना आता नेव्ही ब्लू पीक कॅप देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी मंगळवारी विधानसौध येथे निवडक पोलीस कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलना या नव्या कॅपचे वितरण केले. जून महिन्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वार्षिक मेळाव्यात राज्यातील पोलीस कॉन्स्टेबल आणि हेडकॉन्स्टेबलना नव्या कॅप वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेलंगण पोलीस परिधान करत असल्याप्रमाणे गडद निळ्या रंगाचे पीक कॅप देण्यास राज्य सरकारने संमती दर्शविली होती. त्यानुसार मंगळवारपासून या कॅप राज्यातील कॉन्स्टेबल व हेड कॉन्स्टेबलना देण्यात आल्या आहेत. स्लॉच हॅट्सऐवजी नेव्ही ब्लू पीक कॅप वितरण करण्याची शिफारस अनेक संस्थांनी केली होती. राज्य पोलीस खात्यात 25 टक्के महिला पोलीस खाकी बेरेट कॅप वापरतात. पण आता पुरुष पोलिसांप्रमाणे त्या देखली नेव्ही ब्लू पीक कॅप परिधान करतील.
राज्याला ड्रग्जमुक्त बनविण्याचे ध्येय
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, राज्याला ड्रग्जमुक्त बनविण्याचे माझे ध्येय आहे. हेच ध्येय तुमचे सुद्धा असू द्या. कर्नाटकातील जनता त्यासाठी पोलीस दलासाठी कृतज्ञता व्यक्त करेल. आमचे तरुण, विद्यार्थी ड्रग्जचे बळी ठरू नयेत. यासाठी पोलीस खात्याने ठाम भूमिका घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
-मुख्यमंत्री सिद्धरामय्या
...तर संपूर्ण व्यवस्था कोलमडेल
कोणतेही सरकार आले तरी तुमचा आत्मविश्वास आणि कर्तव्यनिष्ठा यांच्यात तडजोड करू नका. जर तुम्ही तडजोड केली तर संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडेल. समाज व सरकारचा पोलिसांवर अधिक विश्वास आहे. तुम्हीच समाजाचे रक्षक आहात. मागील सरकारच्या काळात राजकीय दबाव किंवा इतरांना खूश करण्यासाठी स्वत:शी तडजोड केली असेल तर तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असा कानमंत्र उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला.
-उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार