पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा सुरळीत
20 प्रचंड खबरदारीचे उपाय, ओळखपत्रधारकांनाच प्रवेश
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : पोलीस दलातील 3 हजार 395 सिव्हिल पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी रविवारी बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 61 परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा झाली. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली होती. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी आदी अधिकाऱ्यांच्या कडक निगराणीत या परीक्षा पार पडल्या.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 46 व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 15 अशा एकूण 61 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाल्या. बेळगाव, चिकोडी व निपाणी येथे 25 हजार 164 परीक्षार्थींनी नावे नोंदवली होती. उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 19 हजार 908 जण परीक्षा लिहिणार होते. त्यापैकी 18 हजार 751 विद्यार्थी परीक्षेला हजर झाले आहेत. 1157 विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत.
परीक्षा केंद्रांपासून 200 मीटर अंतरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश जारी केला होता. पोलीस आयुक्तांनी तर शनिवारी रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन परीक्षेची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत गैरप्रकारांना थारा मिळू नये यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली होती.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तावरील अधिकाऱ्यांनाही स्वतंत्र ओळखपत्र देण्यात आले होते. पोलीस अधिकारी, परीक्षेच्या कर्तव्यासाठी नियुक्त अधिकारी, परीक्षार्थी वगळता परीक्षा केंद्रांवर इतरांना प्रवेशबंदीचा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे शहर व जिल्ह्यातील बहुतेक पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी जुंपण्यात आले होते.
प्रचंड खबरदारी
‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटीनंतर देशाची राजधानी नवी दिल्ली येथे जेन झी ने केलेला उठाव, त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा आदी प्रकारांच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरतीच्या परीक्षेतही असे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रचंड खबरदारी घेण्यात आली होती.