पोलीस कॉन्स्टेबलकडून पत्नीचा खून
सौंदत्ती तालुक्यातील घटना, संशयित ताब्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
एका पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या कंडक्टर पत्नीचा खून केल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील रामापूर साईट येथे घडली आहे. सौंदत्ती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली आहे.
काशव्वा करीकट्टी (वय 34) असे खून झालेल्या महिला कंडक्टरचे नाव आहे. निपाणी पोलीस स्थानकातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष कांबळे (वय 35) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 13 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून ती उशिरा उघडकीस आली आहे. काशव्वा बैलहोंगल तालुक्यातील बेळवडीची. संतोष व काशव्वा यांचा 2013 मध्ये प्रेमविवाह झाला. त्यांना एक मुलगाही आहे. निपाणीत असतानाच या दाम्पत्यामध्ये कौटुंबिक कलह सुरू झाला होता. भांडणाला कंटाळून काशव्वाने सौंदत्ती डेपोला आपली बदली करून घेतली होती.
पती संतोष सौंदत्तीलाही येत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रारही दिली होती. या दोघा जणांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतरही ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. 13 ऑक्टोबर रोजी संतोष आपल्या पत्नीच्या घरी आला. या दोघा जणांमध्ये झालेल्या वादावादीनंतर त्याने तिच्यावर चाकू हल्ला केला. काशव्वाच्या खुनानंतर त्या घराला बाहेरून कुलूप लावून संतोष तेथून निघून गेला. काशव्वा कामावर आली नाही म्हणून तिच्या काही सहकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संपर्क झाला नाही म्हणून ते घरी पोहोचले. गुरुवारी रात्री काही कुटुंबीयही तिच्या घरी आले. त्यावेळी घरातून दुर्गंधी येत होती. दरवाजा फोडून घरात डोकावले असता काशव्वाचा खून झाल्याचे उघडकीस आले. सौंदत्ती पोलीस पुढील तपास करीत आहेत.