शिरसईत खाणीत बुडून पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू
मयत आकाश नाईक पर्वरी पोलिसस्थानकाचा कर्मचारी
म्हापसा : शिरसई ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या कोणशी येथील पठरावरील खाणीच्या खंदकात आंघोळीसाठी गेलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलला बुडून मृत्यू आल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मयत आकाश सुदेश नाईक (रा. सुकूर - पर्वरी) हा पर्वरी पोलिसस्थानकात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुकूर - पर्वरी येथील मित्रांचा एक गट कोणशी शिरसई येथे सहलीसाठी गेला होता. दिवसभर त्यांनी मौजमजा केली. संध्याकाळी पावसाने जोर धरल्यावर खाणीच्या खंदकातील पाणी खूपच गढूळ झाले होते. प्रवाहही वाढला होता. त्यातच आकाशने पाण्यात उडी घेतली असता त्याचे डोके दगडावर आपटले. तो जखमी अवस्थेतच पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्यामुळे त्याच्या मित्रांनाही त्याला वाचवता आले नाही. घटनेची माहिती मित्रांनी म्हापसा अग्निशामक दलास दिल्यावर दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन चोपडेकर, अक्षय सावंत, प्रवीण पिसुर्लेकर, चंद्रकांत नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी लागलीच मृतदेह पाण्याबाहेर काढला. कोलवाळ पोलिस उपनिरीक्षक विष्णू जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवचिकेत्सेसाठी बांबोळी येथे पाठवून दिला.
कर्तबगार पोलिस कॉन्स्टेबल
एक कर्तबगार पोलिस कॉन्स्टेबल म्हणून आकाश परिचित होता. यापूर्वी त्याने कळंगुट पोलिसस्थानकात एलआयबी टीममध्ये काम केले होते. त्यानंतर त्याची बदली पर्वरी पोलिसस्थानकात झाली होती. तेथे आपली उत्कृष्ट सेवा बजावत असतानाच अलिकडेच त्याची पुन्हा कळंगुटला बदली झाली होती. त्याच्या जाण्याने सुकूर - पर्वरी परिसर, कळंगुट तसेच पर्वरी पोलिसस्थानकात शोककळा पसरली होती. आकाशच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर खंदक 11 फूट खोल असल्याची माहिती अधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांनी दिली.