उपनोंदणी कार्यालयातील आधार लिंकची पोलीस आयुक्तांनी घेतली माहिती
बोगस खरेदी-विक्रीला बसणार आळा
बेळगाव : सातबारा उताऱ्याला आधार लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे आता संबंधिताच्या अंगठ्याशिवाय जमीन खरेदी-विक्री करता येणार नाही. याबाबत उपनोंदणी विभागामध्ये ती लिंक सुरू झाली असून त्याची पाहणी पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग यांनी मंगळवारी दक्षिण विभागातील उपनोंदणी कार्यालयामध्ये जाऊन केली. गेल्या काही वर्षांमध्ये जमिनीची खरेदी-विक्री करताना गैरप्रकार करण्यात आले आहेत. संबंधित मालकाला हजर न करता दुसऱ्यालाच त्याठिकाणी हजर करून खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अनेकांची फसवणूक झाली. याबाबत महसूल विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे.
आता शेतकऱ्यांचे सर्व उतारे आधार लिंक करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी किंवा विक्री करायची असेल तर संबंधित उताऱ्यावरील जमीन मालकाने अर्ज दाखल केल्यानंतर मोबाईलवर ओटीपी क्रमांक येणार आहे. त्या ओटीपी क्रमांकानुसार सातबारा उतारा आधार लिंक आहे की नाही ते समजणार आहे. याचबरोबर संबंधित मालकाचा अंगठा घेतल्यानंतरच खरेदी किंवा विक्री व्यवहार पूर्ण होणार आहे. दक्षिण व उत्तर विभागाच्या उपनोंदणी कार्यालयामध्ये याबाबत लिंक करण्यात आली आहे. जागामालक असल्याशिवाय कोणत्याही प्रकारे खरेदी-विक्री करता येणार नाही. याची संपूर्ण माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग यांनी घेतली. यावेळी उपनोंदणी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे लिंक करण्यात आली आहे, तसेच संबंधित व्यवहार कसा होणार, याची माहिती पोलीस आयुक्तांना दिली.