सार्वजनिक ठिकाणी दारू ढोसणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची मोहीम
शहर-तालुक्यात छापे, 17 जण ताब्यात
बेळगाव : गांजाबरोबरच आता सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्धही बेळगाव पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी बेळगाव शहर व तालुक्यात मोहीम राबवून 17 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
खडेबाजार, उद्यमबाग, कॅम्प, टिळकवाडी, शहापूर, हिरेबागेवाडी, काकती, एपीएमसी, बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी मद्यपीविरुद्ध मोहीम राबविली आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक आनंद आदगोंडा यांनी रामदेव गल्ली येथे अजित महादेव कळसाई (वय 36) रा. खडेबाजार, बापट गल्ली याला ताब्यात घेतले आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक किरण होनकट्टी व सहकाऱ्यांनी खादरवाडी क्रॉसजवळ दीपक परशुराम सुतार (वय 30) रा. लक्ष्मी गल्ली, मजगाव याला तर खानापूर रोडवर पोलीस उपनिरीक्षक पी. जी. गंडवगोळ यांनी श्रवण मुरारी मिराशी (वय 33) रा. शिवठाण, ता. खानापूर याला ताब्यात घेतले आहे.
कॅम्पचे पोलीस निरीक्षक आनंद वणकुद्रे यांनी आयनॉक्सजवळ दीपक विजय वाळवेकर (वर 36) रा. फुलबाग गल्ली याला तर पोलीस उपनिरीक्षक आर. आय. सनदी यांनी हर्ष जोतिबा रेडेकर (वय 26) रा. चौथा क्रॉस समर्थ गल्ली, ओंकार महादेव मैन (वय 24) रा. भवानीनगर मंडोळी रोड या दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. टिळकवाडीचे पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ यांनी महावीर भवनजवळ प्रसाद चिठ्ठीबाबू परशबोगू (वय 23) रा. जयनगर हुंचेनहट्टी व जक्कीनहोंडाजवळ पवन मोहन भोसले (वय 37) रा. रामलिंग खिंड गल्ली यांना ताब्यात घेतले.
शहापूरचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. के. बागेवाडी यांनी खासबाग येथील बसवेश्वर सर्कलजवळ चंदन विजय मजुकर (वय 34) रा. मेलगे गल्ली शहापूर याला ताब्यात घेतले. हिरेबागेवाडीचे पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार हिरेबागेवाडीतील एका धाब्याजवळ इम्रान मोहम्मदरफीक सौदागर (वय 29) रा. हिरेबागेवाडी याला तर पोलीस उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. यांनी बस्तवाडजवळ संतोष गुंडू इंडी (वय 29) रा. संभाजी गल्ली, बेळगाव याला ताब्यात घेतले आहे.
भारतनगर, काकती येथे कारवाई
काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मृत्युंजय मठद यांनी भारतनगर, काकती येथे नागराज शंकर सुतार (वय 25) रा.संभाजी गल्ली बेळगाव याला ताब्यात घेतले आहे. एपीएमसीचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. ए. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्योतीनगर कंग्राळी खुर्दजवळ सचिन अशोक तुबची (वय 38) रा. वैभवनगर, प्रज्वल अनंत तंग्गेन्नावर (वय 24) रामनगर कंग्राळी खुर्द, अनिल भीमा कोरवर (वय 27) रा. पेठ गल्ली कडोली या तिघांना ताब्यात घेतले आहे. ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी व सहकाऱ्यांनी नावगेजवळ जयवंत इराप्पा तारीहाळकर (वय 55) रा. बिजगर्णी, राजेंद्र फकिरा मेलगे (वय 30) रा. संतिबस्तवाड या दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व 17 जणांकडून दारूच्या बाटल्या, ग्लास जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर कर्नाटक अबकारी कायदा 15 (ए) 32 (3) अन्वये एफआयआर दाखल केला आहे. उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.