For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार विरेश बोरकरांना पोलिसांनी आणले फरफटत

04:45 AM Feb 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
आमदार विरेश बोरकरांना पोलिसांनी आणले फरफटत
Advertisement

‘टीसीपी ’ कार्यालयासमोर पाळे-शिरदोण ग्रामस्थांचे आक्रोश आंदोलन

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

‘आमची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत नगर नियोजन कार्यालयातून हलणार नाही. नगर नियोजन कलम 39(अ) रद्द करा, अशी मागणी करीत पाळे-शिरदोण  ग्रामस्थांनी शुक्रवारपासून नगरनियोजन कार्यालयात ठिय्या आंदोलन सुऊ करून आंदोलक टीसीपीच्या कार्यालयात ठाण मांडून बसले होते. या पार्श्वभूमीवर काल शनिवारी दुपारी पोलिसांनी बळाचा वापर करून आमदार विरेश बोरकर आणि इतर आंदोलकांना कार्यालयातून बाहेर काढले. आमदार बोरकर यांना पोलिसांनी  पायऱ्यांवरून खाली खेचत आणल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली.  प्रशासनाच्या या दडपशाहीचा निषेध करत आता आंदोलकांनी आझाद मैदानावर धाव घेतली असून आमदार बोरकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

Advertisement

कोणताही अधिकृत आदेश किंवा आश्वासन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा घेत आंदोलकांनी शुक्रवारी संपूर्ण रात्र सरकारी कार्यालयातच घालवली. शनिवारी सकाळी पोलिस फौजफाटा कार्यालयात शिरला आणि त्यांनी आंदोलकांना जबरदस्तीने बाहेर काढण्यास सुऊवात केली. यावेळी आमदार विरेश बोरकर यांना पोलिसांनी फरफटत नेले, यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत ते जखमी झाले. त्यानंतर 108 ऊग्णवाहिका पाचारण करून त्यांची आणि इतर आंदोलकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

आंदोलनाला यश देण्याची श्री साखळेश्वराकडे मागणी

आंदोलकांनी टीसीपी कार्यालयाकडून मोर्चा काढला आणि आझाद मैदानावर उपोषण सुऊ केले आहे. दरम्यान, आंदोलकांनी जुन्या पाटो पुलावर असलेल्या घुमटीसमोर गाऱ्हाणे घातले आणि आंदोलनाला यश देण्याची देवाकडे मागणी केली. आझाद मैदानावर  विरोधी पक्षनेते युरी आलेमांव आणि बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिला. यावेळी आपचे गोवा प्रमुख वाल्मिकी नाईक, तसेच आरजीचे मनोज परब व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत दाखल करणार

पोलिसांनी कोणत्याही लेखी आदेशाशिवाय लोकप्रतिनिधीवर केलेल्या या कारवाईविरोधात विधानसभेत ‘हक्कभंग प्रस्ताव’ दाखल करणार असल्याचे बोरकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर कायदेशीर खटला दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मंत्री विश्वजित राणेंच्या वक्तव्यामुळे आंदोलन चिघळले

मंत्री विश्वजित राणे यांनी सावर्डे येथे एका कार्यक्रमात आंदोलकांविरोधात  प्रखर टीका केली आणि त्यांनी सांगितले की, गरज भासल्यास आपण सत्तरीतून 45 हजार लोक आणू शकतो. त्यामुळे कुणीही विनाकारण सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. अशा या ब्लॅकमेलिंगच्या डावपेचांना आम्ही बळी पडणार नाही असे विश्वजित राणे यांनी म्हटले आहे. कायदे हे विधानसभेत बनतात, रस्त्यावर उतरून नाही. या विधानामुळे हे दुसऱ्या दिवशीचे आंदोलन चिघळले.

 आमदार बोरकर यांची मंत्री विश्वजित राणे यांच्यावर टीका

सांत आंद्रे मतदारसंघातील लोकांच्या जमिनींवर गोमेकॉ, एफडीए आणि मिलिट्री कॅम्पसारखे प्रकल्प आले, तेथील लोकांच्या तोंडाला पाने पुसून तिथे नोकऱ्या मात्र फक्त सत्तरीतील लोकांना दिल्या गेल्या आहेत. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे आता गाव एकवटून हे प्रकल्प रोखून धरतील, असा इशारा आमदार बोरकर यांनी दिला आहे. केवळ सत्ता आणि पैसा यासाठी मंत्री विश्वजित  राणे गोव्यातील जमीनी दिल्लीवाल्यांच्या घशात घालीत आहेत,  अशा शब्दात आमदार बोरकर यांनी विश्वजित राणेवर खरपूस टीका केली आहे. सध्या हे आंदोलन आझाद मैदानावर सुऊ असून, जोपर्यंत कलम 39 (अ) अंतर्गत झालेले बदल रद्द होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

नगर नियोजन कायदा कलम 39 (अ) ची झळ संपूर्ण गोव्याला

नगर नियोजन कायदा कलम 39(अ) याची झळ संपूर्ण गोव्याला पोहचत आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात संपूर्ण गोवेकरांनी आवाज उठवणे गरजेचे आहे. मंत्री विश्वजित राणे यांनी सत्तरीतून 45 हजार लोक आणण्याचे केलेले वक्तव्य मुळात हास्यास्पद आहे. पाळे- शिरदोण ग्रामस्थांचे आंदोलन हे वाळपईकरांच्या विरोधात नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे, असे सत्तरी आणि उसगाव भागातून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या लोकांनी सांगितले. सत्तरी आणि उसगाव भागातून विरेश गोवेकर, मिलिंद प्रभू व अन्य काही लोकांनी आझाद मैदानावर येऊन आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. राणे कुटुंबाने सत्तरीतील लोकांना लाचार बनवले आहे. ही लाचारी संपुष्टात येईल आणि राणे कुटुंबीयांना त्यांची जागा दाखवतील असेही त्यांनी सांगितले.  

Advertisement
Tags :

.