अमेरिकेत गुरुद्वारामध्ये पोहोचले पोलीस
ट्रम्प यांनी बदलले नियम : अवैध स्थलांतरित लपल्याचा संशय
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यापासून अवैध स्थलांतरितांचा शोध घेण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. अमेरिकेतील पोलीस अणि यंत्रणा अवैध स्थलांतरितांना ताब्यात घेत त्यांना डिपोर्ट करत आहेत. ही कारवाई आता धार्मिक स्थळांमध्ये देखील सुरू झाली आहे. अमेरिकेतील पोलिसांनी न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमध्ये काही गुरुद्वारांमध्ये शोध घेतला आहे. धार्मिक स्थळांमध्ये अवैध स्थलांतरित लपलेले असू शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर पोलिसांनी धार्मिक स्थळांची शुचिता न राखल्याने शीख संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.
न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी यासारख्या शहरांमधील गुरुद्वारांना युएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीच्या (डीएचएस) अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. अवैध स्थलांतरितांच्या उपस्थितीविषयी चौकशीसाठी करण्यात आलेल्या या कारवाईवर शीख संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अशाप्रकारच्या कारवाईमुळे शिखांचे धार्मिक स्वातंत्र्य प्रभावित होते. तसेच स्थलांतरित समुदायामध्ये भीतीदायक संदेश जात असल्याचे शीख अमेरिकन लीगल अँड एज्युकेशन फंडने म्हटले आहे.
ही कारवाई इमिग्रेशन कायद्यांना कठोरपणे लागू करत अवैध स्वरुपात आलेल्या गुन्हेगार विदेशींना देशाबाहेर हाकलण्यासाठी आहे, यात मारेकरी आणि बलात्कारी देखील सामील आहेत. अशाप्रकारचे गुन्हेगार आता अटक टाळण्यासाठी अमेरिकेतील शाळा, गुरुद्वारा, चर्च किंवा अन्य धार्मिक स्थळांमध्ये लपू शकणार नाहीत. आम्ही अशा ठिकाणांवरूनही त्यांना शोधून काढू असे डीएचएसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
माजी अध्यक्ष जो बिडेन यांच्या कार्यकाळात संवेदनशील क्षेत्रांमध्ये कायदा-अंमलबजावणी यंत्रणांयच कारवाइा& स्थगिती देणारे दिशानिर्देश देण्यात आले होते. हे दिशानिर्देश ट्रम्प प्रशासनाने मागे घेतले आहेत. या बदलामुळे यंत्रणांना गुरुद्वारा अणि चर्च यासारख्या प्रार्थनास्थळांमध्ये शिरण्याची अनुमती मिळाली आहे. उपाध्यक्ष जेडी वेंस यांनीही धार्मिक स्थळांवरील इमिग्रेशन छापेमारीची शक्यता फेटाळली नाही. जनतेच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक ठरत असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
शीख संघटनांमध्ये चिंता
होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटकडून गुरुद्वारा सारख्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करण्यात आल्याने आम्ही चिंतेत आहोत. अशाप्रकारच्या कारवाईमुळे शीख धर्माच्या प्रार्थनास्थळांच्या पावित्र्याला धोका आहे. अशाप्रकारची कारवाई शिखांच्या धार्मिक प्रथांनुसार एकत्र येणे आणि परस्परांसोबत जोडण्याचे स्वातंत्र्य कमी करत असल्याचा दावा शीख अमेरिकन लीगल डिफेन्स अँड एज्युकेशन फंडच्या कार्यकारी संचालिका किरण कौर गिल यांनी केला आहे.