सावंतवाडीत हिंदू संघटनांनी लावलेला बॅनर पोलिस आणि पालिकेने हटवला
सावंतवाडी । प्रतिनिधी
विश्व हिंदू परिषद , बजरंग दल , हिंदू जागरण मंच आणि सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग तर्फे येथील मोती तलावाच्या तीन मुशी जवळ लावण्यात आलेला बॅनर पालिका प्रशासन आणि पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी हटवला. या बॅनरवर आक्षेपार्ह मजकूर असल्याने त्या मजकुरावर पेपर लावण्यात आले . यादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी याला आक्षेप घेतला सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच नाही . कुठल्या समाजाचा उल्लेख नाही त्यामुळे हा बॅनर हटवणे चुकीचे आहे . बॅनर हटवण्यावरून अप्रिय घटना घडल्यास पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे स्पष्ट केले. पालिका मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी यावेळी बॅनर लावण्यासाठी परवानगी घेण्यात आली नाही असे स्पष्ट करत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपल्याला आदर आहे. परंतु बॅनर लावण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. शहरात परवानगी न घेता लावण्यात आलेले बॅनर हटवण्यात आले आहेत.त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे . सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी आता आम्ही परवानगी घेऊनच बॅनर लावू असा इशारा दिला यावेळी अश्विनी पाटील यांनी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना हात जोडून सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पगुच्छ अर्पण करून आदरांजली वाहिली आणि त्यानंतरच बॅनर हटवण्यात आला. पेहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी हा बॅनर लावण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण उपस्थित होते. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली .