पोलिसांची तत्परता : बालक सुखरुप
खानापूर : छत्तीसगड राज्यातील पलारी जिल्ह्यातील डमी गावातील विक्रम चव्हाण हा दहा वर्षाचा मुलगा काही दिवसापूर्वी घरी झालेल्या किरकोळ वादामुळे रुसून घर सोडून रेल्वेतून प्रवास करत खानापुरात आला होता.तो विद्यानगर येथे फिरत असताना नागरिकांनी खानापूर पोलीस स्थानकाला कळविले. पोलिसांनी त्याची चौकशी करून पालकांशी संपर्क साधून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी पालकांनी खानापूर पोलिसांचे आभार मानत मुलाला कवटाळले. चार दिवसांपूर्वी खानापूर रेल्वेस्टेशन जवळील विद्यानगर भागात दहा वर्षाचा मुलगा केविलवाण्या अवस्थेत फिरत होता. याची माहिती खानापूर पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी तत्परता दाखवत मुलाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. मात्र त्याला इतर भाषा येत नसल्याने पोलिसांना माहिती मिळविणे कठीण बनले हेते. शेवटी छत्तीसगड राज्याचे नाव घेतल्यानंतर त्याला मोबाईलमधून छत्तीसगड राज्यातील गावे दाखविण्यात आली. त्यावेळी त्याने आपले गाव ओळखून आपल्या वडिलांचे पंक्चरचे दुकान पोलिसांना दाखविले. दुकानाच्या फलकावरील मोबाईल नंबरवरून पोलिसानी संपर्क साधला असता आपला मुलगा काही दिवसांपासून घरातून गेल्याचे सांगितले. मात्र, मोबाईलवरून संपर्क झाल्यावर पालकांना आपला मुलगा सापडल्याचा आनंद झाला. विक्रमचे आई-वडील खानापूरला आल्यानंतर मुलाला पालकांच्या स्वाधीन केले. खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक एम. गिरीश, जयराम हमण्णावर, कुतुबुद्दीन सनदी, नदाफ यांनी या कामी परिश्रम घेतले.