नवजाताला ठार केल्याचा पोलिसांवर आरोप
झारखंडच्या गिरिडीह येथील धक्कादायक घटना
वृत्तसंस्था /गिरिडीह
झारखंडच्या गिरिडीह जिल्हय़ात छाप्यांची कारवाई करत असताना पोलिसांनी कथितपणे बूटांनी चिरडल्याने एका नवजाताचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी 6 पोलीस कर्मचाऱयांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर यातील 5 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 4 दिवस वय असलेल्या नवजाताचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱयाने दिली आहे. देवरी पोलीस स्थानकातील संगम पाठक आणि एस.के. मंडल या अधिकाऱयांसमवेत 6 पोलीस कर्मचाऱयांच्या विरोधात गुन्हा नेंदविण्यात आला आहे. यातील 5 जणांना निलंबित करण्यात आले आहे. कथित घटना देवरी पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱया कोशोगोंदो दिघी गावात बुधवारी घडली आहे. पोलिसांचे पथक दोन आरोपींना अटक करण्यासाठी एका घरात शिरले असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याचे अधिकाऱयाने सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री हेंमत सोरेन यांना नवजाताच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. नवजाताच्या मृत्यूस पोलीस जबाबदार असल्याचा आरोप झाल्यावर दंडाधिकाऱयांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला होता. पंचनामा झाल्यावर शवविच्छेदनासाठी मृतदेह गिरिडीह येथे पाठविण्यात आला होता. दंडाधिकाऱयांच्या उपस्थितीत हे शवविच्छेदन पार पडले आहे.