बसर अल-असाद यांच्यावर रशियात विषप्रयोग
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियात राहत असलेले सीरियाचे माजी अध्यक्ष बसर अल-असाद यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 59 वर्षीय असाद रविवारी गंभीर स्वरुपात आजारी पडले होते, त्यांना मोठ्या प्रमाणात खोकला अन् श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. चाचणीनंतर त्यांच्या शरीरात विष पोहोचल्याची पुष्टी झाली.
याचदरम्यान रशियन अधिकारी विषप्रयोगात सामील गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. परंतु या घटनेसंबंधी रशियन अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. बसर अल-असाद हे मागील महिन्यात सीरियात सत्तापालट झाल्यापासून स्वत:च्या परिवारासोबत मॉस्को येथे वास्तव्यास आहेत. रशियाने असाद परिवाराला राजनयिक आश्रय दिला असून एका अपार्टमेंटमध्ये त्याच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रशियाच्या एका माजी गुप्तहेराकडून चालविण्यात येणारे ऑनलाइन अकौंट जनरल एसव्हीआरने सर्वप्रथम बसर अल असाद आजारी पडल्याच दावा केला होता. परंतु असाद यांच्यावर विषप्रयोग कुणी केला, याचा अद्याप खुलासा झालेला नाही. रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पेत्रुशेव्ह समवेत रशियन अधिकाऱ्यांना या घटनेविषयी माहिती देण्यात आली आहे. असाद कशाप्रकारे विषाच्या संपर्कात आले हे शोधून काढण्यासाठी आता चौकशी केली जात आहे.
असाद यांच्या पत्नीला आजार
सीरियाचे माजी अध्यक्ष असाद यांच्या पत्नीला ब्लड कॅन्सर झाला असल्याची माहिती मागील महिन्यातसमोर आली होती. असाद यांच्या पत्नी अस्मा या ब्रिटनमध्ये परतू इच्छितात, परंतु पासपोर्टची वैधता संपल्याने त्यांना लंडन येथे परतता येणार नाही. अस्मा यांचा जन्म 1975 साली लंडनमध्ये झाला होता. त्यांचे आईवडिल सीरियन होते. अस्मा यांच्यकडे ब्रिटन तसेच सीरियाचे दुहेरी नागरिकत्व आहे. अस्मा यांना ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्यूकेमिया असून त्या सध्या मॉस्कोमध्ये उपचार करवून घेत असल्याचे समजते. सध्या त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. अस्मा यांनी डिसेंबर 2000 मध्ये असाद यांच्यासोबत विवाह केला हात. अस्मा आणि असाद यांना तीन मुले असून त्यांची नावे हाफिज जीन अणि करीम अशी आहेत.